कोल्हापूर : पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महापालिकेत घेतलेल्या बैठकीनंतर प्रशासनाचा कारभार सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असताना तो आणखी गाळात जाताना दिसत आहे. शहर हरित करण्याची वल्गना केली जात असताना दुसरीकडे विना परवाना, राजकीय दबावातून वृक्षतोड सुरू आहे. याकडे उद्यान विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे गुरुवारी ‘कोल्हापूर नेक्स्ट ‘ या नागरी संघटनेने महापालिकेत अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला, पण ते निरुत्तर झाले.
दरम्यान, याच मुद्द्यावरून पर्यावरण अभ्यासक, महापालिका उद्यान समितीचे सदस्य डॉ. मधुकर बाचुळकर यांनीही अधिकाऱ्यांची हजेरी घेतली. ब्रह्मेश्वर बाग परिसरामध्ये महानगरपालिका कर्मचारी यांनी तीन झाडांची कत्तल केली आहे. या संदर्भात उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांशी कोल्हापूर नेक्स्टने संपर्क साधला असता उत्तर देण्याचे टाळण्यात आले. याबाबत आज या संघटनेने उपायुक्त शिल्पा दरेकर, शहर अभियंता रमेश मस्कर, उद्यान विभाग प्रमुख समीर व्याघ्रांबरे यांच्याशी चर्चा केली.
अधिकारी धारेवर
उद्यान अधीक्षकांनी तेथील दोन झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी परवानगी दिल्याचे सांगितले. दोन धोकादायक फांद्या छाटणीची परवानगी असताना केवळ बुंधा ठेवून तीन झाडे सरसकट कापली गेली आहेत. हे झाड आता जगण्याची शक्यता कमीच आहे. पंचनाम्याला उद्यान अधीक्षकांनी दांडी मारली, असा आरोप करून शिष्टमंडळाने उद्यान अधीक्षक व्याघ्रांबरे यांना धारेवर धरले. घटनेचा, जागेचा पंचनामा न केल्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले.
मुकादमाची मक्तेदारी
झाडे जगणार नाहीत अशा पद्धतीने तोडण्याचे प्रकार शहरात वारंवार घडत आहेत. वृक्षतोडीचा कंत्राटदार आणि एक मुकादम लोकांकडून पैसे घेऊन झाडे तोडतात, असा आरोप करून शिष्टमंडळाने संबंधित मुकादमास निलंबित करून सखोल चौकशी करावी. अनेक वर्षे ज्ञानेश्वर बांड हा एकच ठेकेदार असल्याने त्याला हटवून अन्य एकापेक्षा अधिक ठेकेदारांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली.
पंचनाम्याचे आदेश
एक आठवड्यात कारवाई न झाल्यास महानगरपालिकेवर फौजदारी करू, असाही इशारा चंद्रकांत चव्हाण, अजित ठाणेकर, चंद्रकांत घाडगे, प्रदीप उलपे, विजयसिंह खाडे पाटील, स्वाती कदम, ओंकार गोसावी आदींनी दिला. अतिरिक्त आयुक्तांनी तातडीने पंचनामा करण्याचे आदेश उद्यान अधीक्षकांना दिले.