लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील महत्त्वाची संस्था असलेली शेतकरी संघाची निवडणूक सर्व पक्षांनी एकत्रित लढवून जिंकली असली तरी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी मध्ये महायुतीने बाजी मारली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे मुरगूड येथील समर्थक प्रवीणसिंह पाटील यांची अध्यक्षपदी तर खासदार धनंजय महाडिक यांचे समर्थक भाजपचे राजसिंह शेळके यांची उपाध्यक्षपदीनिवड झाली. नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी निळकंठ करे यांच्या अध्यक्षतेखाली होवून त्यामध्ये ही निवड करण्यात आली. या दोघांची निवड एक- एक वर्षासाठी आहे.

अध्यक्षपदासाठी स्पर्धा

अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार विनय कोरे, माजी आमदार अमल महाडिक यांनी संचालकांची मते जाणून घेतली होती. अध्यक्षपदासाठी प्रवीणसिंह पाटील, जी. डी. पाटील, अमरसिंह माने, सुनील मोदी हे शर्यतीत होते. अध्यक्षपदासाठी पाटील यांचे नाव जी. डी. पाटील यांनी सुचविले तर अमरसिंह माने यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी शेळके यांचे नाव दत्तात्रय राणे यांनी सुचविले तर सर्जेराव पाटील यांनी अनुमोदन दिले.

आणखी वाचा-संभाजीराजे यांच्यासोबत वरिष्ठ पातळीवर चर्चा; कोल्हापूर लोकसभेबाबत लवकरच निर्णय – सतेज पाटील

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनुभवी नेतृत्व

बिद्री साखर कारखान्याचे २२ वर्षे संचालक असलेले प्रवीणसिंह पाटील यांनी यापूर्वी मुरगुडचे नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले असून त्यांचे वडील विश्वनाथ पाटील हे संघाचे अध्यक्ष होते. शेळके यांनी कोल्हापूर महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केले आहे. निवडीनंतर शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष युवराज पाटील यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष- उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक अजित मोहिते, आनंदा बनकर, दत्ताजीराव वारके, अप्पासो चौगुले, सुभाष जामदार, विजयसिंह युवराज पाटील, बाबासाहेब शिंदे, प्रधान पाटील, जयकुमार मुनोळी, परशुराम कांबळे, सुनील मोदी, रोहिणी धनाजी पाटील, अपर्णा अमित पाटील आदी उपस्थित होते.