कोल्हापूर : निवडणूक रोखे हा देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे. कारवाई करण्याची भीती दाखवून भाजपने १० हजार कोटी रुपये जमवले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या प्रचारासाठी मतदार संघातील सर्वात मोठ्या इचलकरंजी या शहरात रात्री पहिली प्रचार सभा झाली. यावेळी जयंत पाटील प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी त्यांनी निवडणूक रोख्याच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले, निवडणूक रोखे हा देशातील सर्वात मोठा घोटाळा ठरला आहे. अनेक कंपन्यांना, कंपन्यांच्या प्रमुखांना धमकावले गेले. इडीचा वापर केला. जे घाबरले नाहीत त्यांना अटक करण्याची भीती दाखवली गेली. या माध्यमातून दहा हजार कोटी रुपयांची माया भाजपने जमवलेली आहे.

हेही वाचा…माफी मागायचा प्रश्नच नाही; दत्तक वारस विरोधातील उग्र जनआंदोलनाचा इतिहास जाणून घ्यावा – संजय मंडलिक

या देशातील संविधान धोक्यात आणण्याचे काम केंद्रातील सरकार करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून अनेक चांगल्या गोष्टी दिल्या आहेत. पण त्याला केंद्र सरकार शह देत आहे. काश्मीर मध्ये ३७० कलम हे विशेष अधिकारासाठी दिले होते. पण तेही मोडीत काढण्याचे काम केले आहे. या देशातील लोकशाही धोक्यात आणण्याचे काम करत असल्याने आपण सर्वांनी त्या विरोधात लढा उभारला पाहिजे, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

वस्त्र नगरी इचलकरंजीचा उल्लेख करून जयंत पाटील म्हणाले, कापड विकल्यानंतर ४५ दिवसात बिल दिले नाही तर कारवाई करणारे नवे धोरण आणले आहे. याचा परिणाम वस्त्र उद्योगावर झाला असून मोठ्या प्रमाणात मंदी आली आहे. वस्त्रोद्योगासाठी पूर्वी काँग्रेसचे सरकार अनेक चांगली धोरणे राबवत होते. पण ते आता मोडीत काढण्याचे काम सुरू आहे. यामुळे काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये जीएसटी कर कमी करण्याच्या आश्वासन दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील हीच भूमिका असेल ,असे ते म्हणाले.

हेही वाचा…संजय मंडलिक यांच्या त्या विधाना विरोधात शाहू प्रेमींची कोल्हापुरात निदर्शने

तर राजकारण सोडेन – सरूडकर

उमेदवार सत्यजित पाटील यांनी इचलकरंजीच्या पाणी प्रश्नाचा उल्लेख केला. आजी-माजी खासदारांनी पाणी प्रश्न सोडवतो असे सांगून मते घेतली. मात्र त्यांनी फसवणूक केली, अशी टीका खासदार धैर्यशील माने माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर करून सरूडकर पाटील म्हणाले, इचलकरंजीचा पाणी प्रश्न सोडवला नाही तर राजकारण करणार नाही. वस्त्र उद्योगातील प्रश्न सोडवण्यासाठी ठोस भूमिका घेतली जाईल.यंत्रमागाच्या विज बिलतील अडचणी दूर केल्या जातील.

हेही वाचा…आताचे महाराज दत्तक आलेले; ते खरे वारसदार नाहीत; संजय मंडलिक यांची काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराजांवर टीका

कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी मतदारसंघात नेटके प्रचाराचे नियोजन करण्याबाबत सूचना केल्या. सद्यपरिस्थिती पाहता या मतदारसंघात वातावरण चांगले असल्याने त्याचा फायदा घ्यावा ,असे आवाहन केले. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर , राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे, ताराराणी आघाडीचे नेते सागर चाळके, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महादेव गौड, शहर प्रमुख सयाजी चव्हाण , अमरजीत जाधव, प्रकाश मोरवाळे, आदींची भाषणे झाली प्रमोद खुडे यांनी सूत्र संचालन केले.