कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. राज्यात सरसकट कर्जमाफी करावी, ओला दुष्काळ जाहीर करावा या मागण्या राष्ट्रवादीने दोन महिन्यांपूर्वी करूनही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. आता खूप उशीर झाला असून, शासनाने हा निर्णय लवकर घोषित करावा; अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसला रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठवावा लागेल, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिला.
त्या म्हणाल्या, की जुलै महिन्यामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ खासदारांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन महाराष्ट्रात सरसकट कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत राज्य शासनाला सांगावे, अशी मागणी केली होती. परंतु इतक्या कालावधीनंतरही याबाबत काहीच घडलेली नाही असेही त्या म्हणाल्या.
गेल्या वर्षी राज्यातील हेच सरकार सत्ता दिली, तर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात येईल, शेतमालाला हमीभाव देण्यात येईल, असे कोल्हापूरमध्ये जाहीरपणे सांगत होते. परंतु पुढचा ऑक्टोबर आला, तरी याबाबत कसलाही निर्णय घेतलेला नाही. सततचा पाऊस, अतिवृष्टी यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला असताना, शासन याबाबत ठोस निर्णय घेत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला आंदोलनाचे पाऊल उचलावे लागणार आहे. शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पासाठी ८० हजार कोटी घालण्यापेक्षा शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करणे अपेक्षित असल्याचे सुळे म्हणाल्या. हैदराबाद गॅझेटचा नेमका काय उपयोग होणार आहे, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे, असे आवाहनही त्यांनी केले.