नवरात्रोत्सव अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला असताना करवीरनगरीत उत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरात यंदा प्लास्टिकमुक्त उत्सव साजरा करण्यात येणार असून सुरक्षिततेकडेही विशेष लक्ष पुरविले जात आहे. या वर्षी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमार्फत भाविकांना प्रथमच प्रसाद वाटप होणार आहे.
करवीरनगरीतील नवरात्रोत्सवाला विशेष महत्त्व आहे. साडेतीन खंडपीठापकी एक शक्तिपीठ म्हणून करवीरनगरीची ओळख आहे. येथील दसरा शाही दसरा म्हणून ओळखला जातो. नवरात्रोत्सवाची दखल घेत देवस्थान समिती, श्रीपूजक, जिल्हा प्रशासन यांनी तयारीकडे लक्ष दिले आहे. उत्सवकाळात विविध राज्यांमधून दहा ते बारा लाख भाविक दशर्नासाठी येत असतात. या पार्श्र्वभूमीवर बठकीत मंदिराच्या आतील आणि बाहेरील सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.अमित सनी यांनी दिल्या आहेत.
यंदाचा उत्सव पर्यावरणपूरक करण्याचे ठरविले आहे. महालक्ष्मी मंदिरात उत्सवादरम्यान प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठय़ा प्रमाणात होतो. त्यामुळे प्लास्टिकमुक्त उत्सवाचा मानस जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ओटीचे साहित्य, प्रसाद आणि पूजेचे इतर साहित्य प्लास्टिक पिशव्यांमधून विकले जाऊ नये यासाठी प्रयत्न केला जाणार आहेत. नवरात्रौत्सवादरम्यान आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी परवानगी घेऊनच मंडप उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याचदरम्यान मोहरम असल्याने या दोन्ही सणांमध्ये सौहार्दाचे वातावरण राहावे आणि शांततेत सण-उत्सव पार पडावेत यासाठी सुरक्षेवर भर देण्यात येणार आहे. शहरात येणाऱ्या सर्वच रस्त्यांवर टोलनाक्यांच्या ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात येणार आहेत.
दरम्यान, महालक्ष्मी मंदिरातील स्वच्छता, सजावट, रंगरंगोटीचे काम वेगाने सुरु आहे. पाण्याचा जोरदार मारा करून मंदिराचा परिसर लख्ख केला जात आहे. बुधवारी मंदिराचा गाभारा स्वच्छ करण्यात आला. त्यासाठी देवीच्या मूळ मूर्तीवर इरलं पांघरण्यात आले होते. स्वच्छता काळात मूर्तीचे दर्शन बंद राहिले. संध्याकाळी ७ नंतर मूर्ती पूर्ववत दर्शनासाठी खुली करण्यात आली. नवरात्रोत्सवाच्या पार्श्र्वभूमीवर मंगळवारी अंबाबाई मंदिरातील हायमास्ट दिवे बदलण्यात आल्याने मंदिराचा परिसर उजळून निघणार आहे.
नवरात्रोत्सवाच्या तयारीला करवीरनगरीत वेग
साडेतीन खंडपीठापकी एक शक्तिपीठ म्हणून करवीरनगरीची ओळख
Written by अपर्णा देगावकर
First published on: 09-10-2015 at 03:40 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preparation begin of navratri in kolhapur