शिवाजी महाराजांच्या विचारांचं प्रतिबिंब आज आपल्याला संविधानात दिसून येत आहे. त्यांच्या विचारांचा आणि संविधानाचा थेट संबंध आहे. संविधानात अशी एकही तरतूद नाही, जी शिवाजी महाराजांच्या विचारातून आलेली नाही. त्यांच्या विचारातून संविधानाची निर्मिती झाली आहे. मात्र, भाजपाकडून याच संविधानसा संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. कोल्हपूरमध्ये आज राहुल गांधी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी बोलताना त्यांनी भाजपाला लक्ष्य केलं.

नेमंक काय म्हणाले राहुल गांधी?

“आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी इथे जमलो आहोत. हा केवळ एक पुतळा नाही. तर एक विचार आहे. पुतळा तेव्हाच बनवला जातो, जेव्हा आपण त्या व्यक्तीच्या विचारांचा आदर करतो. छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यभर ज्या विचारांसाठी लढले, तोच विचार आपण पुढे घेऊन जाणार नसू तर आज या पुतळ्याच्या अनावरणाचा काहीही अर्थ राहणार नाही”, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली.

“शिवाजी महाराजांनी आपल्याला संदेश दिला, की हा देश सर्वांचा आहे. इथे कोणावरही अन्याय होता कामा नये. त्याच विचारांचं प्रतिबिंब आज आपल्याला संविधानात दिसून येत आहे. त्यांच्या विचारांचा आणि संविधानाचा थेट संबंध आहे. संविधानात अशी एकही तरतूद नाही, जी शिवाजी महाराजांच्या विचारातून आलेली नाही. त्यांच्या विचारातून संविधानाची निर्मिती झाली आहे. शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांसारखी लोक जन्माला आली नसती, तर आपलं संविधानही नसतं. भारतात सध्या दोन विचारधारांची लढाई सुरू आहे. एक विचारधारा जी संविधानाचं तसेच समानतेचं रक्षण करते आहे. तर दुसरी विचारधारा संविधान संपवण्याचा प्रयत्न करते आहे”, असंही राहुल गांधी म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, “ज्यावेळी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणार होता, तेव्हा भाजपाच्या विचारधारेच्या लोकांनी त्यांचा राज्याभिषेक होऊ नये, यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे आज सुरु असलेली विचारधारेची लढाई ही खूप जुनी आहे. या विचारधारेविरोधात शिवाजी महाराजदेखील लढले होते आणि आता याच विचारधारेच्या विरोधात काँग्रेस पक्षही लढतो आहे. ज्याप्रकारे या लोकांनी शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला विरोध केला, त्याप्रमाणे आताच्या सत्ताधाऱ्यांनी संसदेच्या उद्घाटनाला आदिवासी राष्ट्रपती असलेल्या द्रौपदी मुर्मू यांना बोलवलं नाही”, असंही त्यांनी नमूद केलं.

पुढे बोलताना त्यांनी भाजपालाही लक्ष्य केलं. “भाजपाचे लोक सकाळी उठतात आणि शिवाजी महाराजांच्या विचारांचं संविधान कसं संपायचं यासाठी प्रयत्न करतात. भाजपाचे लोक भारतातील विविध संस्थांवर आक्रमण करतात. लोकांना घाबरतात आणि इतकं करूनही परत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होतात. याला काहीही अर्थ नाही. जर तुम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर तर नतमस्त होत असाल, तर तुम्हाला संविधानाचे रक्षण करावंच लागेल”, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवरूनही राहुल गांधी यांनी भाजपावर शाब्दिक हल्ला चढवला. “भाजपाने राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. मात्र, काही दिवसांतच तो पुतळा कोसळला, कारण सरकारची नियत खराब होती. शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार असाल, तर त्यांच्या विचारांचे संरक्षण करावंच लागेल, असा संदेश महाराजांच्या पुतळ्याने दिला. मात्र, भाजपाचे लोक महाराजांच्या पुतळ्यासमोर जाऊन हात जोडतात. मात्र, त्यांचेच विचार पायदळी तुडवण्याचं काम करतात”, असेही ते म्हणाले.