उसाला एकरकमी प्रतिटन ३३०० रुपये दर देण्याची मागणी करत सकल ऊस उत्पादक ऊस परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ऊसतोड रोखण्याचे आंदोलन हाती घेतले आहे. या संघटनेने स्वाभिमानीचा गड असलेल्या शिरोळ तालुक्यात ऊसतोड रोखली. साखर कारखान्यांनी ऊसदराचा निर्णय होईपर्यंत ऊसतोडी सुरू करू नयेत, अन्यथा साखर कारखान्यांच्या विभागीय कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा सकल ऊस परिषदेच्यावतीने देण्यात आला. यामुळे या कारखान्यासह अन्य कारखान्याच्या गाळपावर परिणाम होऊ लागला असून शरद साखर कारखान्याच्या संचालकांनी निर्णय झाल्याशिवाय ऊसतोड करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

गत सालात गळीत झालेल्या उसाचे अंतिम बिल मिळण्यात यावे व गाळपास येणाऱ्या उसास दर ठरविण्यात यावा, तोपर्यंत साखर कारखान्यांनी ऊस तोडी देऊ नये, या आशयाचे निवेदन दत्त शिरोळ, गुरुदत्त टाकळीवाडी, जवाहर हुपरी, पंचगंगा इचलकरंजी या साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनास दिले होते. मात्र शिरोळ तालुक्यात जवाहर, शरद आणि पंचगंगा या साखर कारखान्यांनी ऊसतोड कामगारांना ऊसतोडी दिल्या होत्या. शिरोळ तालुक्यात या कारखान्यांनी ऊसतोड दिली असल्याची माहिती सकल ऊस उत्पादक ऊस परिषदेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. कार्यकर्त्यांनी शिरोळ, कुरूंदवाड, शेडशाळ, गौरवाड, कनवाड, शिरटी, दानोळी या भागात सुरू असलेल्या ऊसतोडी आज कार्यकर्त्यांनी रोखल्या.

सकल ऊस उत्पादक ऊस परिषदेच्या कार्यकर्त्यांनी अिहसक पद्धतीने आजचे आंदोलन केले. ऊसतोडी आहेत त्याठिकाणी जाऊन ऊसतोड मजुरांना व वाहन मालकांना हात जोडून विनंती करून सुरू असलेल्या ऊसतोडी बंद केल्या.

पत्रकारांशी बोलताना दादा काळे, बंटी देसाई, मुकुंद गावडे म्हणाले, गांधीगिरी पद्धतीने आम्ही या ऊसतोडी बंद केल्या आहेत. आम्हाला शेतकरी व वाहनमालकांचे नुकसान करायचे नाही. तरीही या दोन्ही साखर कारखान्यांनी पुन्हा ऊसतोडी सुरू केल्यास त्यांच्या विभागीय कार्यालयास टाळे टोकण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.