नवरात्रीत महालक्ष्मीच्या दारासमोर नियोजनाचा गोंधळ

मंदिर परिसरातील निर्बंधांमुळे कोल्हापूरमध्ये व्यापारी-प्रशासन संघर्ष

मंदिर परिसरातील निर्बंधांमुळे कोल्हापूरमध्ये व्यापारी-प्रशासन संघर्ष

दयानंद लिपारे, लोकसत्ता

कोल्हापूर : नवरात्रीमध्ये करवीरनिवासिनी महालक्ष्मी मंदिर आणि परिसर भाविकांच्या गर्दीने भरलेला असतो. पण मंदिर परिसरातील व्यापारी भागात बॅरिकेटेड (लोखंडी कठडे) लावून बंद करण्यात आल्याने व्यापाराला खीळ बसली आहे. यामुळे नवरात्रीच्या मुख्य सणावेळी देवीच्या दारासमोर नियोजनाचा गोंधळ सुरू आहे. यात व्यापाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. प्रशासन विरुद्ध व्यापारी असा नवा संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळत असून या वादात भाजपने व्यापाऱ्यांची बाजू उचलून धरली आहे.

जून – जुलै महिन्यामध्ये राज्यात कोल्हापूर करोनाबाधितांच्या संख्येत पहिल्या क्रमांकावर होते. याच वेळी राज्यात अनेक ठिकाणी व्यापाराला मुभा दिली होती. त्यावर कोल्हापुरातही व्यापार सुरू राहावा अशी व्यापारी संघटना, चेंबर ऑफ कॉमर्स यांची भूमिका होती. जिल्हा प्रशासनाकडून परवानगी दिली जात नव्हती. यातून व्यापारी आणि जिल्हा प्रशासनामध्ये टोकाचा संघर्ष रंगला होता. करोना संसर्ग कमी झाल्यावर अलीकडे कोठे व्यापार पूर्ववत होऊ लागला आहे. पूर्वी झालेले नुकसान, कर्ज – व्याजाचे ओझे दसरा- दिवाळीच्या हंगामात भरून काढू असा विचार करून व्यापाऱ्यांनी नव्या मालाची खरेदी करून कंबर कसली; पण नियोजनाचे त्रांगडे उभे राहिल्याने अपेक्षांवर पाणी फिरले. नवरात्रीचे मुख्य आकर्षण असणाऱ्या महालक्ष्मी परिसरातील व्यापारी पेठांची जिल्हा प्रशासनाने नाकेबंदी केल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या व्यापाऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. व्यापारी – प्रशासन संघर्ष तापला असताना जिल्ह्य़ातील तिन्ही मंत्री मौन बाळगून असल्याने व्यापारी निराश झाले आहेत.

नियोजनावर प्रश्नचिन्ह

कोल्हापूर शहरामध्ये सर्वात जुनी आणि महत्त्वाची बाजारपेठ म्हणून महाद्वार रोड आणि परिसर ओळखला जातो. येथेच साडेतीन खंडपीठात समाविष्ट करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर आहे. घटस्थापनेपासून देवीच्या दर्शनाला देशभरातून भाविकांची रीघ लागलेली असते. गणेश विसर्जन दिवशी वाहतुकीच्या नियोजनाचा भाग म्हणून महाद्वार रोड प्रथमच बंद ठेवला होता. नवरात्रीत त्याचीच पुनरावृत्ती होत आहे. बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार चौक, ज्योतिबा रोड, गुजरी, पापाची तिकटी, शिवाजी पुतळा, सरलष्कर भवन, भवानी मंडप, भाऊसिंगजी रोड, बिंदू चौक, मिरजकर तिकटी अशा मोठय़ा परिसराला बॅरिकेटिंग केल्याने एकही वाहन सोडले जात नाही. व्यापाऱ्यांना मालाची ने – आण करता येत नाही. ‘निव्वळ गर्दीवर नियंत्रण मिळवताना कोणतीही ठोस उपाययोजना, नियोजन न करता परिसर वाहतुकीला बंद करून येथील हजारो व्यापाऱ्यांच्या गळ्याभोवती कर्जाचा आणि बेरोजगारीचा फास आवळण्याचे काम प्रशासन करत आहे. वाहतूक, वाहनतळाचे सुयोग्य नियोजनासाठी मोकळ्या जागांचा अभ्यास व तेथील वापर तसेच स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून गर्दीवर निश्चितच नियंत्रण ठेवता येते. प्रशासन रस्ते बंद करण्यातच धन्यता मानत आहे’, असा आरोप बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीचे अध्यक्ष, महाद्वार रोड व्यापारी रहिवासी संघाच्या वतीने रामेश्वर पतकी यांनी केला आहे.

व्यापारी डबघाईला

दसरा आणि दिवाळी यासाठी महाद्वार रोड आणि परिसरात खरेदीदारांची संख्या मोठी असते.  करोना संकटामुळे व्यापारी आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यातच महालक्ष्मी मंदिर बंद असल्यामुळे या परिसरातील सर्व व्यापारी चिंताग्रस्त झाले आहेत. अनेक कर्मचाऱ्यांना बेरोजगार व्हावे लागले आहे. मंदिराच्या ओवऱ्यावर व्यापार करणाऱ्यांना तर मंदिरात प्रवेशच मिळत नाही. ‘प्रशासनाच्या चुकीच्या कृतीमुळे या संपूर्ण परिसरातील व्यापारी अस्वस्थ झाले असून व्यापाराला खीळ बसली आहे. यंदा ई- पास असल्याने भाविकांची गर्दी कमी असल्याने  निर्बंध कमी करून व्यापाऱ्यांना दिलासा देता येणे शक्य आहे’, अशी भूमिका भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी मांडली आहे.

महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात प्रतिवर्षीप्रमाणेच यंदाचेही नियोजन केले आहे. भाविकांचे दर्शन व सुरक्षा याचा विचार केला आहे. अडचणी लक्षात घेऊन शक्य त्या ठिकाणी व्यापार सुलभ व्हावा यासाठी नियोजन केले जात आहे. ६५ वर्षांवरील भाविकांना दर्शन नसल्यामुळे त्यांना व्यापारी पेठेत येण्याचा त्रास होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. वाहनतळाच्या ठिकाणी फलक लावले असल्याने भाविकांचा गोंधळ होत नाही. उत्तम नियोजन होण्याच्या दृष्टीने चांगल्या सूचना केल्या तर त्याचा निश्चित विचार केला जाईल’.

– राहुल रेखावार, जिल्हाधिकारी, कोल्हापूर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कोल्हापूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Traders administration conflict in kolhapur due to restrictions on temple premises zws