कोल्हापूर : अवकाळी पावसाने मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्याला झोडपून काढले. विशेषतः जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागात विजेचा गडगडाटासह जोरदार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. हा पाऊस रब्बी पिकाला पोषक ठरणार आहे. पावसामुळे ऊसतोड थांबली आहे, गेला आठवडाभर उकाडा वाढला होता. हवामान विभागाने येत्या दोन दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली होती. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी पावसाने हजेरी लावली. तासाहून अधिक काळ पाऊस कोसळत होता. पावसामुळे रस्त्यावरील गर्दीला ओहोटी लागली होती.
दुष्काळी भागात धुवाधार
हातकणंगले, शिरोळ तालुक्याला अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. ढगांचा गडगडाट होत पाऊस कोसळून या भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. सखल भागातील रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले होते. त्यातून मार्ग काढताना वाहनधारक, नागरिकांना कसरत करावी लागली.
हेही वाचा – कोल्हापूरचा पंचगंगा घाट हजारो दिव्यांनी प्रकाशमान
पिकांना रब्बीला पोषक
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले हा तालुका दुष्काळी जाहीर करण्यात आला आहे. आजचा पाऊस हातकणंगले, शिरोळ या कमी पाऊस पडणाऱ्या दोन्ही तालुक्यातील रब्बी पिकासाठी उपयुक्त ठरणार आहे. तर या पावसाचा फटका पालेभाज्या कांदा या पिकांना बसला आहे.
हेही वाचा – कोल्हापुरात हापूस आंबा दाखल; कोकणातील नव्हे तर दक्षिण आफ्रिकेचा
गाळपावर परिणाम
गेले महिनाभर ऊस दर आंदोलनामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस गाळप ठप्प झाले होते. या आठवड्यात कारखाने सुरू झाले असताना आजच्या पावसाच्या जोरामुळे ऊस तोडी बंद झाल्या. शेतातून वाहन बाहेर काढण्याची कसरत सुरू होती. पुढील काही दिवस ऊस तोडीवर परिणाम होणार आहे. कारखान्याच्या माळरानावर ऊसतोड मजूर दाखल झाले आहेत. त्यांच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरल्याने मजुरांचे हाल झाले.