कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या पाणीपुरवठ्यातील दोष दुरुस्त करण्यास महापालिकेची यंत्रणा अकार्यक्षम ठरल्याने पुण्याहून अद्यावत तंत्रज्ञान व तंत्रज्ञान यांना पाचारण करण्यात आले. तथापि अजूनही काळम्मावाडी पंपातील तांत्रिक बिघाड कायम असल्यामुळे कोल्हापूर शहराला आजही टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे गुरुवारी प्रशासनाने सांगितलेले आहे. दरम्यान, गणपतीची प्रतिष्ठापना झाली तरी पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांचा संयम सुटला आहे. आज पुन्हा शहरात जागोजागी आंदोलन सुरू झाले आहेत. भाजपने मिरजकर तिकटी परिसरात आंदोलन सुरू केले आहे.

ऐन गणेश चतुर्थी सणात कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पाणीपुरवठ्यातील दोष निराकरण करण्यात कोल्हापूर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला अपयश आले आहे. यामुळे पुणे महापालिकेशी संपर्क साधून अद्यावत तंत्रज्ञान व तंत्रज्ञ यांना निमंत्रित केले आहे.

तांत्रिक दोष कायम

या पथकाने काम सुरू केले आहे. पहाटे चार वाजेपर्यंत दुरुस्तीचे प्रयत्न सुरू होते. त्यामध्ये पुन्हा तांत्रिक दोष उद्भवला. रेनबो इलेक्ट्रिकलचे कन्सल्टंट काशिनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू झाले. अन्य अभियंता पाचारण करण्यात आले. पण अद्यापही दोष दुरुस्ती झालेली नसल्याने पाणीपुरवठा विस्कळीत आहे.

आजही टँकरवरच भिस्त

यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा होणार असल्याचे आज महापालिकेने जाहीर केले आहे. यासाठी महापालिकेने बुधवार प्रमाणेच नियोजन केले आहे.अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त व सहा. आयुक्त व इतर अधिकारी स्वतः विविध ठिकाणी टँकर वितरणाच्या कामावर उपस्थित आहेत.

पोलीस बंदोबस्तातत पाणी वितरण

शहरातील पाणीटंचाई लक्षात घेऊन महापालिकेचे व खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. यासाठी ३२ टँकरची व्यवस्था करण्यात आली असून त्यांची क्षमता साधारण १० ते ३० हजार लिटरपर्यंत आहे. या टँकरद्वारे पाणी वितरणासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून संपर्कासाठी मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. या दोन्ही ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून टँकरद्वारे शिस्तबद्ध पाणी वितरण करण्यात येत आहे.

रास्ता रोको आंदोलन

महालक्ष्मी मंदिर परिसरात पाणीपुरवठ्याचे तीन तेरा वाजल्याने आज भाजप मंडल चिटणीस रश्मी श्रीनिवास साळोखे यांच्या नेतृत्वाखाली मिरजकर तिकटी परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. भाजप कार्यकर्ते ,महिला, नागरिक यांनी आंदोलनात सहभाग घेऊन महापालिकेच्या निष्क्रिय कारभारावर तोफ डागली.

प्रभाग क्रमांक ३३, महालक्ष्मी मंदिर या परिसरातील मिरजकर तिकटी,सारथी हॉटेल,पोतनीस बोळ,गुरु महाराज वाडा,विठ्ठल मंदिर ,अंधशाळे समोरील भाग येथे गेली अनेक वर्ष पाण्याचा प्रश्न रेंगाळला आहे. याची माहिती पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना वारंवार देऊनही हा प्रश्न सुटलेला नाही. वारंवार माहिती देऊन, अधिकाऱ्यांनी जागेवर बोलवून पूर्ण भागाचा सर्वे करूनही पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

उलट, काही अधिकाऱ्यांकडून उद्धट उत्तरे देण्यात येतात. दिवसेंदिवस हा प्रश्न अतिशय गंभीर होत असून,आता ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे. श्री गणेशाचे आगमन होवून सुद्धा पाण्याची प्रचंड अडचण असून पुढचे १० दिवस कसे काढायचे, हा प्रश्न आहे. पाणी प्रश्न तत्काळ मार्गी लागावा या करिता गुरुवारी मिरजकर तिकटी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी,कार्यकर्त्यां सह नागरिक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या कोल्हापूर महापालिकेच्या भोंगळ पाणीपुरवठ्याच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.