कोल्हापूर : जगातील कापसाचे उत्पादन घटल्याने एकीकडे वाढलेले भाव आणि दुसरीकडे कापड उद्योगातील मंदीमुळे सुताच्या दरातील घसरण अशा विचित्र आर्थिक कोंडीमुळे राज्यातील सहकारी सूतगिरण्या लवकरच बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. केवळ चालू आठवड्यात कापसाच्या दरात प्रति खंडी चार ते पाच हजार रुपयांनी वाढ झाली आहे. तर सुताच्या भावात प्रति किलो दहा ते बारा रुपयांची घट झाल्याने हा व्यवसाय चालवणे अवघड बनले आहे. हे बिघडलेले आर्थिक चक्र असेच सुरू राहिले तर दिवाळीनंतर सूतगिरण्या बंद ठेवण्याच्या मन:स्थितीत चालक आले आहेत.

गेल्या दोन-तीन हंगामांमध्ये कापसाच्या दराची मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. याचा विपरित परिणाम यंत्रमाग, सूतगिरणी, कापड प्रक्रिया, गारमेंट अशा संपूर्ण वस्त्रोद्योग शृंखलेवर होत आहे. अमेरिका, भारत, इजिप्त या कापूस उत्पादक देशांतील उत्पादन घटल्याने दोन वर्षांपूर्वी कापसाने दराची उसळी घेतली होती. त्यातच यंदा पुन्हा अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. आताही मुसळधार पाऊस सुरू आहे. बोंडे फुटण्याच्या वेळीच हा पाऊस आल्याने त्याचा परिणाम आता कापूस उत्पादनावर होणार आहे. याचा परिणाम पुन्हा कापसाच्या दरवाढीवर होणार आहे. महिन्याभरापूर्वी ५७ हजार रुपये प्रतिखंडी (एक खंडी म्हणजे ३५६ किलो) असणारा कापूस सध्या ६१ हजार रुपये दराने विकला जात आहे. त्याचीही उपलब्धता कमी प्रमाणात आहे. त्यामुळे अगोदरच परवडेनासा झालेला कापूस आणखी भाव खाणार यांची चिंता सूतगिरणी चालकांना लागून राहिली आहे.

आणखी वाचा-वारणा दूध संघामार्फत जातीवंत म्हैस संवर्धन, विक्री केंद्राची उभारणी; ४२ हजारांचे अनुदान देणार – विनय कोरे

सूत दरात घसरण

कापसासारख्या मुख्य कच्च्या मालामध्ये सतत दरवाढ होत असल्याने सूतगिरण्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे. हा खर्च भागविण्यासाठी स्वाभाविकपणे त्यांच्या उत्पादित सुताला अधिक दर मिळणे अपेक्षित आहे. मात्र या पातळीवर सूतगिरण्यांचा गेल्या अनेक महिन्यांपासून अपेक्षाभंग होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कापड उद्योगात जागतिक मंदी राहत असल्याने सुताला अपेक्षेएवढी मागणी येत नसल्याने दिवसेंदिवस दर कोसळत आहेत. ‘३२ नंबर’ या उभ्या विणल्या जाणाऱ्या सुताची एक आठवड्यापूर्वी प्रति ५ किलोला १२८५ रुपयांनी विक्री होत होती. हा दर एका आठवड्यात १२६५ रुपयांवर आला आहे. तर याच नंबरचे आडवे विणले जाणारे सूत प्रति ५ किलोला १२९१ रुपयानी विकले जात होते. तो दर आता आठवड्यात १२६० रुपयांवर आला आहे. दर कोसळत असताना दुसरीकडे जागतिक मंदीमुळे सुताच्या मागणीतही रोज घट होत आहे.

आणखी वाचा-एक वनस्पती… फुलपाखरांच्या ४२ प्रजातींची लाडकी; आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत संशोधन प्रसिद्ध

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या सूतगिरणी उद्योग वेगवेगळ्या अडचणींतून जात आहे. कापसाचे दर वाढले आहेत. सुताचे दर घटले आहेत. कापडाला मागणी नसल्याने सूत विकले जात नसल्याने सूतगिरण्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. सूतगिरण्यांना प्रति किलो १५ रुपये प्रमाणे नुकसान सोसावे लागत आहे. बहुतेक सूतगिरण्यांना सतत तोटा सहन करावा लागत आहे. एकंदरीत सूतगिरण्यांच्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे दिवाळीनंतर त्या चालवायच्या की नाही याचा गांभीर्याने विचार केला जात आहे. -अशोक स्वामी, अध्यक्ष, राज्य वस्त्रोद्योग महासंघ