इंडोनेशियात पार पडलेल्या एशियाड क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्यपदकाची कमाई केली. मात्र सुवर्णपदकासाठी दावेदार मानल्या जाणाऱ्या भारतीय हॉकी संघाला उपांत्य फेरीत मलेशियाविरुद्ध पेनल्टी शूटआऊटवर पराभवाचा सामना करावा लागला. हा पराभव भारतीय हॉकीच्या चांगलाच जिव्हारी लागलेला आहे. हॉकी इंडियाने या पराभवानंतर प्रशिक्षक हरेंद्र सिंह व अन्य प्रशिक्षक वर्गाला, हॉकी विश्वचषकापर्यंत कामगिरीत सुधारणा करण्याची तंबी दिली आहे. असं न झाल्यास प्रशिक्षकांना आपली नोकरी गमवावी लागू शकेल, असेही संकेत हॉकी इंडियाने दिले आहेत.

साखळी सामन्यांमध्ये भारतीय संघाने आपल्या प्रतिस्पर्धी संघांवर मात करत तब्बल ७६ गोल केले. मात्र मलेशियाविरुद्ध सामन्यात भारताला चांगलाच धक्का बसला. “यंदाच्या स्पर्धेत पुरुष संघाने पुरती निराशा केली आहे. खेळाडू हे फक्त सोशल मीडियावर व्यस्त असतात, त्यांच्यात अजिबात शिस्त राहिलेली नाहीये. भारताच्या अॅथलिट, बॅडमिंटनपटूंकडून त्यांनी काही गोष्टी शिकण्याची गरज आहे.” पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत हॉकी इंडियाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने आपली नाराजी व्यक्त केली.

एशियाडमधील पराभवामुळे भारतीय हॉकी संघाचे २०२० टोकीयो ऑलिम्पिकला थेट पात्र होण्याचे दरवाजे बंद झाले आहेत. “या पराभवावर नेमकं काय बोलावं हेच मला कळत नाहीये. साखळी सामन्यांमध्ये केलेल्या ७६ गोलनंतर भारतीय संघाच्या डोक्यात हवा गेली असावी. अशाप्रकारच्या खेळाची आम्हाला अपेक्षाच नव्हती. गेली दोन वर्ष केलेली मेहनत यामुळे वाया गेली आहे.” हॉकी इंडियाच्या अधिकाऱ्याने आपलं मत मांडलं. अवघ्या काही महिन्यांवर विश्वचषक येऊन ठेपलेला आहे, त्याआधी भारतीय संघाची अशी कामगिरी नक्कीच चांगली नाही. त्यामुळे आगामी विश्वचषकात भारतीय संघ कशी कामगिरी करतो यावर प्रशिक्षक व इतर सहकाऱ्यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे.

संपूर्ण प्रशिक्षण वर्ग या पराभवाला जबाबदार असल्याचंही हॉकी इंडियाच्या अधिकाऱ्याने म्हटलं आहे. मलेशियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाची कोणतीही रणनिती मैदानात दिसली नाही. फक्त महिन्याच्या महिन्याला पगार घेण्यासाठी प्रशिक्षकांची नियुक्ती केलेली नाहीये. पुरुष संघाच्या तुलनेत महिला संघाने अधिक आश्वासक कामगिरी केल्याचंही अधिकारी म्हणाला. त्यामुळे हॉकी इंडियाच्या अशा कठोर पवित्र्यानंतर आगामी विश्वचषकात भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.