भारताविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात सध्या इंग्लंडचा दुसरा डाव सुरु आहे. या सामन्यात आता इंग्लंड भक्कम आघाडीच्या दिशेने वाटचाल करत आहे. इंग्लंडला भक्कम धावसंख्येकडे नेण्यामागे अलिस्टर कुक आणि जो रूट या दोन अनुभवी फलंदाजांचा हात आहे. यातील कूकसाठी हा सामना विशष महत्वाचा आहे. कूक आपल्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळत असून या सामन्यानंतर तो क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. मात्र हा सामना त्याच्या साठी एक विशेष आठवण देणारा ठरला आहे. कूकने आपल्या शेवटच्या सामन्यात एका प्रतिष्ठेच्या यादीत ‘टॉप ५’मध्ये स्थान मिळवले आहे.

इंग्लंडच्या दुसऱ्या डावात कूकने हा बहुमान पटकावला आहे. त्याने आपल्या शेवटच्या डावात उत्तम खेळी करत कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत पाचव्या क्रमांकाचा फलंदाज होण्याचा मान मिळवला आहे.

या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा १५९२१ धावांसह अव्वलस्थानी आहे. तर रिकी पॉन्टिंग (१३,३७८), जॅक कॅलिस (१३,२८९) आणि राहुल द्रविड (१३,२८८) हे यादीत अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर विराजमान आहेत.

या यादीत गेले अनेक दिवस श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा हा १२,४४० धावांसह पाचव्या स्थानी होता. मात्र पहिल्या डावात अर्धशतक (७१) आणि दुसऱ्या डावात शतकी खेळी करत कूकने या यादीच्या टॉप ५ मध्ये स्थान मिळवले आहे.