आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यंदाच्या आयपीएल हंगामाबद्दल अजुनही आशावादी आहे. देशभरात करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम अनिश्चीत काळासाठी स्थगित केला होता. मात्र ही स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होण्याची शक्यता आहे. यासाठी बीसीसीआय वर्षाअखेरीस आयपीएलचं आयोजन करता येतं का याची चाचपणी करत आहे.

“वर्षाअखेरीस वेळापत्रकामध्ये काही बदल केले तर यंदाचं आयपीएलचं होईल याबद्दल मी अजुनही आशावादी आहे. जर प्रेक्षकांविना सामने खेळवण्याचं ठरवल्यास, ३-४ मैदानांवर हे सामने खेळवता येऊ शकतात. अजुनही या हंगामाचं आयपीएल खेळवलं जाण्याची शक्यता आहे आणि यासाठी आशावादी आहे.” अनिल कुंबळे स्टार स्पोर्ट्स वाहिनीच्या ‘क्रिकेट कनेक्टेड’ या कार्यक्रमात बोलत होता.

२९ मार्चपासून आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार होती, परंतू करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने ही स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली. मात्र दरम्यानच्या काळात परिस्थितीत सुधारणा न झाल्यामुळे अखेरीस बीसीसीआयने पुढील सूचना मिळेपर्यंत ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला.