अहमदाबाद येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत अश्विनने आपल्या फिरकीच्या तालावर इंग्लंडच्या फलंदाजांना नाचवलं. अश्विनने दुसऱ्या डावांत कसोटीमध्ये ४०० बळींचा टप्पा गाठला. ४०० बळींचा टप्पा गाठण्यासाठी त्याला २१ हजार २४२ चेंडू टाकावे लागले. तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात जोफ्रा आर्चरला बाद करत अश्विननं हा पराक्रम केला. ४०० कसोटी बळींचा टप्पा गाठणारा अश्विन जगातला १७वा तर भारताचा चौथा गोलंदाज ठरला. या आधी कपिल देव, अनिल कुंबळे आणि हरभजन सिंह या गोलंदाजांनी हा टप्पा पार केला होता. भारताकडून अनिल कुंबळेने सर्वाधिक ६१९ कसोटी बळी घेतले. त्याचा हा विक्रम मोडणार का? या प्रश्नावर अश्विनने झकास उत्तर दिलं.

रवी शास्त्रींनी स्वत:च्याच मीम्सवर दिला भन्नाट रिप्लाय

“आपण जर संख्यांचा विचार केला तर मी कुंबळेपेक्षा २१८ बळी दूर आहे. त्यामुळे सध्या मी कोणत्याही मोठ्या पराक्रमांचा विचार करणं सोडून दिलंय. मी काय करू शकतो? माझ्या गोलंदाजीत अधिक सुधारणा कशी करता येऊ शकेल? संघासाठी मी अजून काय करू शकतो? याचा सध्या मी विचार करतोय. गेले काही वर्षांपासून मी केवळ कसोटी क्रिकेटच खेळतो आहे. त्यामुळे जेव्हा कसोटी क्रिकेट खेळलं जाईल तेव्हा मला त्यात सर्वोत्तम कामगिरी कशी करता येईल याकडे माझं संपूर्ण लक्ष आहे”, असं अश्विन म्हणाला.

Ind vs Eng: खेळपट्टीचा वाद ऐन रंगात असताना गावसकरांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले..

“क्रिकेटपटू आणि व्यक्ती म्हणून माझ्यात आवश्यक त्या सुधारणा मी करतो आहे. माझ्या कामगिरीत अपेक्षित सुधारणा होत असल्याने मी खूप आनंदी आहे. मी कसोटी आणि खेळाचा आनंद घेत आहे. तसेच माझ्या मते गेल्या १५ वर्षांत माझी आताची कामगिरी सर्वोत्तम होत आहे. मला सध्या अशाच प्रकारचा खेळ खेळणं सुरू ठेवायचे आहे. कोणताही विक्रम किंवा पराक्रम करण्याबद्दल मी फारसा विचार करत नाहीये”, असं अश्विनने स्पष्ट केलं.