साखळी गटात चुरशीच्या लढतीत विजय मिळविण्याची किमया केल्यानंतर बडोदा आणि उत्तर प्रदेश यांच्यात सोमवारी सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेचा अंतिम मुकाबला रंगणार आहे. वानखेडेवर स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात शानदार कामगिरीसह जेतेपद पटकावण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.
सरस धावगतीच्या जोरावर गटात अव्वल स्थान राखत दोन्ही संघांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. साखळी गटातल्या शेवटच्या लढतीत उत्तर प्रदेशने गोव्यावर मात केली, तर बडोद्याला केरळविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. विभागीय स्तरावरच्या सर्व लढती जिंकत या दोन्ही संघांनी बादफेरीत आगेकूच केली होती. विभागीय तसेच बादफेरीच्या लढती मुंबईतच खेळल्याने बडोदा संघाला या वातावरणात सातत्याने खेळण्याचा फायदा अंतिम लढतीत पण मिळणार आहे. सलग सात विजय मिळवत बडोद्याने दिमाखदार कामगिरी केली, परंतु शेवटच्या साखळी लढतीत त्यांचा विजयरथ केरळने रोखला. बडोद्याचा डावखुरा फिरकीपटू ल्युकमान मेरीवाल स्पर्धेतील सर्वाधिक विकेट्स मिळविणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. अंतिम फेरीत दिमाखदार कामगिरीसह संघाला जेतेपद मिळवून देण्यासाठी तो प्रयत्नशील आहे. क्रुणाल पंडय़ा, हार्दिक पंडय़ा आणि अनुभवी मुनाफ पटेल यांच्यावरही बडोद्याची भिस्त आहे. फलंदाजीत आदित्य वाघमोडे आणि केदार देवधर या जोडीवर जबाबदारी आहे.