Ind vs Eng : इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. कसोटी मालिकेत भारतीय संघाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. या निराशाजनक कामगिरीबाबत भारतीय संघाला जाब विचारला जाण्याची शक्यता आहे. तसेच व्यवस्थापनाकडून अहवाल आल्यावर त्याचे परीक्षण केले जाईल आणि निर्णय घेण्यात येईल, असे संकेत BCCIच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी दिले आहेत.

पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की संघातील खेळाडूंना आणि संघ व्यवस्थापनाला कारवाईचा सामना करावा लागू शकतो. पण याबाबत मी आता काहीही बोलणार नाही. संघ व्यवस्थापनाकडून मालिकेतील कामगिरीचा आढावा नेहमी मालिका किंवा दौरा संपला कि मागवला जातो. तसाच या मालिकेचा अहवालही मागवला जाईल. संघ व्यवस्थापनाच्या अहवालानंतर संघाच्या कामगिरीचे परीक्षण केले जाईल आणि मग आम्ही पुढील निर्णय घेऊ, असेही राय यांनी स्पष्ट केले.

भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. पण फलंदाज मात्र या मालिकेत अपयशी ठरले आहेत. याशिवाय, संघ व्यवस्थापन आणि संघ निवड हे मुद्देदेखील वादाचे ठरले आहेत. त्यामुळे प्रशासकीय समितीने दिलेला इशाऱ्याचे गांभीर्य लक्षात घेत भविष्यात काही मोठे निर्णय घेण्यात येतील का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.