संपूर्ण देश स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना संध्याकाळी सात वाजल्यानंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत आपली निवृत्ती जाहीर केली. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना धोनीने अचानक निवृत्ती जाहीर केल्यामुळे चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. आतापर्यंत तुम्ही माझ्यावर केलेल्या प्रेमाबद्दल तुमचा आभारी आहे, आज संध्याकाळी सात वाजून २९ मिनीटांपासून मी निवृत्त झालोय असं समजा. धोनीने निवृत्तीसाठी साधलेला दिवस आणि वेळ यावरुन सोशल मीडियावर अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. परंतू धोनीने आपली निवृत्ती ही अचानक जाहीर केली नसून याबद्दल त्याने BCCI ला कल्पना दिली होती.

आज तक वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार, धोनीने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याला पत्र लिहून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारणार असल्याचं सांगितलं. कोणत्याही भारतीय खेळाडूला निवृत्तीचा निर्णय जाहीर करण्याआधी बीसीसीआयला त्याची कल्पना द्यावी लागते. धोनीनेही याचप्रमाणे बीसीसीआयला पत्र लिहून आपण निवृत्त होणार असल्याचं कळवलं होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असतो तरीही पुढची काही वर्ष आयपीएल खेळत राहणार असल्याचंही धोनीने यावेळी नमूद केलं. धोनी सध्या आगामी आयपीएल हंगामाची तयारी करतो आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात युएईमध्ये खेळवल्या जाणाऱ्या आयपीएल हंगामासाठी धोनी सज्ज झाला आहे. सध्या आपल्या चेन्नई सुपरकिंग्जमधील सहकाऱ्यांसोबत तो सराव शिबीरात सहभागी झाला आहे. २० ऑगस्टनंतर चेन्नईचा संघ युएईला रवाना होणार आहे.

अवश्य वाचा – सात वाजल्यानंतरची इन्स्टाग्राम पोस्ट आणि ‘धोनी’पर्वाची अखेर, काय असू शकतात धोनीच्या निवृत्तीची कारणं??