गुजरात लायन्सने दिलेल्या २०९ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या दोन युवा क्रिकेटपटूंनी जिवाचे रान करत संघाला विजय प्राप्त करून दिला. रणजी सामन्यांत लक्षवेधी कामगिरी करून राष्ट्रीय संघात वर्णी लागण्यासाठी दावेदार मानले जाणाऱ्या ऋभष पंत आणि संजू सॅमसनने आयपीएलमध्ये आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवले. प्रतिस्पर्धी संघात गोलंदाजांचा भरणा असतानाही ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांनी आपल्या फलंदाजीचे कसब सिद्ध करून दाखवत तिसऱ्या विकेटसाठी १४३ धावांची भागीदारी रचली.

ऋषभ पंतने ४३ चेंडूत ९७ धावांची वादळी खेळी साकारली. पंतचे शतक अवघ्या तीन धावांनी हुकले. तर सॅमसनने ३१ चेंडूत ६१ धावा ठोकल्या. दोनशेहून अधिक धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेमकं मैदानात दोघांमध्ये काय संभाषण झालं, याचा उलगडा संजू सॅमसनने ‘आयपीएल टी-२० डॉटकॉम’ला दिलेल्या मुलाखतीत केला.

वाचा: पैसे नसल्यामुळे ‘हा’ क्रिकेटपटू लंगरमध्ये जेवायचा आणि गुरूद्वारात झोपायचा…

”भाय जादा सोचो मत, बस मारते रहो.”, असे ऋषभने आपल्याला सांगितल्याचे संजू सॅमसन म्हणाला. सामन्याची परिस्थिती पाहता ऋषभचा सल्ला अतिशय योग्य होता. सामन्यात आम्हाला जास्तीत जास्त धावांची गरज होती. त्यामुळे प्रत्येक चेंडूवर जास्तीत जास्त धावा घेण्याच्या उद्देशानेच आम्ही खेळत होतो. ऋषभसोबतच्या बॅटींगचा मी खूप आनंद घेतला, असेही सॅमसनने सांगितले.

 

दिल्ली डेअरडेव्हिल्सचा प्रशिक्षक राहुल द्रविडनेही या दोन युवा क्रिकेटपटूंचे कौतुक केले. युवा खेळाडूंना संघासाठी मोठी खेळी करताना पाहून खूप आनंद झाला. अशा खेळींनीच खेळाडू परिपक्व होतात. या दोघांची फलंदाजी पाहण्याचं भाग्य मला मिळालं, असे द्रविड म्हणाला.