News Flash

BLOG : संयमशून्य, उद्धट फलंदाजांमुळे भारताचा वर्ल्डकप धोक्यात?

विश्वचषकाची रंगीत तालीम म्हणून बघितली गेलेली तिरंगी स्पर्धा भारतीय संघासाठी एकच रंग घेऊन आली तो म्हणजे अंधाराचा गडद काळा रंग.

| February 3, 2015 01:15 am

BLOG : संयमशून्य, उद्धट फलंदाजांमुळे भारताचा वर्ल्डकप धोक्यात?

विश्वचषकाची रंगीत तालीम म्हणून बघितली गेलेली तिरंगी स्पर्धा भारतीय संघासाठी एकच रंग घेऊन आली तो म्हणजे अंधाराचा गडद काळा रंग. सुमार गोलंदाजीमुळे संघाच्या एका बाजूस अर्धागवायू झाल्यामुळे दुसरी बाजू तरी भक्कमपणे उभी राहील, ही अपेक्षा सामन्यागणिक फोल ठरत आहे. गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीत आनंदी आनंद असताना उरल्यासुरल्या क्षेत्ररक्षण आणि यष्टिरक्षणावर आपण विश्वचषक जिंकू शकू हे मानायचे का इतर संघाचा खेळ बघत वर्ल्ड कपचा आनंद घ्यायचा हे ठरवले पाहिजे.
भारतीय फलंदाजी एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून देण्यात कायमच सिंहाचा वाटा उचलत आली आहे. प्रथम फलंदाजी करताना तगडी धावसंख्या उभी करायची किंवा दुसऱ्या फलंदाजीला मोठय़ा धावसंख्येचा उत्तम पाठलाग करायचा या तत्त्वावरच आपले बहुतांशी एकदिवसीय विजय बेतलेले असतात. निदान गेल्या पंधरा वर्षांचा हा इतिहास आहे. पण नव्या पिढीचे फलंदाज कोणत्याही सामन्याची पहिल्या पंधरा ते वीस षटकांत वाट लावताना दिसतायत. या फलंदाजांचा पन्नास षटकांच्या सामन्यासाठी काय अ‍ॅप्रोच आहे, हे अजिबात कळत नाही. इनिंग बांधावी लागते, पहिल्या पंधरा षटकांची गरज, सोळा ते चाळीस मधली फलंदाजी, शेवटच्या दहा षटकांची फलंदाजी असल्या नियोजनावर या फलंदाजांचा विश्वास नाही. मला वाटते, मॅचच्या आदल्या दिवशी रात्री स्वप्नात या फलंदाजांना कोणीतरी दिव्य साक्षात्कार देऊन सांगतो, की ‘अरे मुलांनो, तुम्ही मैदानावर गेलात की तुमची नावं रहाणे, रैना, जडेजाऐवजी रिचर्ड्स, सोबर्स, लॉईड होतील. तुम्ही काहीही करू शकाल. दुनिया की कोई ताकद..’ वगैरे वगैरे. फलंदाजीचे नियोजन, संयम वगैरे अ ब क ड नियम र स त ळ ला गेले आहेत. दोन चेंडूंवर धावा नाही निघाल्या की यांचा अहंकार दुखावला जातो. विकेटच्या मध्यावर येऊन फिरव दाणपट्टा. हे आक्रमण नाही आक्रस्ताळेपणा आहे. प्रत्येक सामन्यात असेच वाद झाल्यावर याला उर्मटपणा म्हणतात. ऑफ स्पीनर दिसला की रैना आलाच पुढे. जडेजाने तर टेनिसमधल्या सर्व फटक्यांचे आतापर्यंत प्रदर्शन घडवून हातात झेल काढून दिले आहेत. रहाणे चांगला फलंदाज आहे. पण आक्रमकतेचं अ‍ॅड्रेनॅलीन तो फार वेळ थोपवू शकत नाही. प्रत्येक प्रश्नाला आक्रमण हेच उत्तर आहे, असं समजून खेळल्यामुळे आपली टीम पन्नास षटकं खेळू शकत नाही. ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडच्या विकेट्सवर स्वैर आक्रमकता बिलकूल चालू शकत नाही. चार आणि सहा धावा २ + २ किंवा २ + १ + २ + १ अशाही मिळतात हे सूत्र आयपीएल सम्राट पूर्ण विसरले आहेत. २५, ३० धावा झाल्या की शेवटच्या षटकापर्यंत थांबायचे आहे, हे यांना कळतच नाही. पंधरा ते चाळीस षटकांतील फलंदाजी तर या फलंदाजांना लष्कराच्या पाच वर्षांच्या प्रशिक्षणासारखी वाटत असावी. कंटाळवाणी, सहनशीलतेचा अंत पाहणारी. त्यामुळे वर्ल्ड कप सुरू झाल्यावर संघ व्यवस्थापनाने मोकाट फलंदाजांवर नियम घालून द्यायला हवेत. धोनीने प्रत्येक जण नियम पाळतो का, हे काटेकोरपणे पाहायला हवे. प्रत्येकाने किमान एवढे चेंडू खेळायलाच हवेत. परिस्थितीनुसारच रीत बदलावी, हे फलंदाजीचे मूलभूत नियम त्रिकालाबाधित आहेत. संयम, एकाग्रता, चिकाटी जाणूनबुजून जोपासावी लागते. हे गुण गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करून घेता येत नाहीत, हे या ‘मोबाइल’ फलंदाजांना पटवून दिले पाहिजे.
– रवि पत्की
sachoten@hotmail.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2015 1:15 am

Web Title: blog by ravi patki on bad performance of indian team in tri series
टॅग : Ravi Patki
Next Stories
1 महाराष्ट्राला अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्ण
2 सचिन माझ्या आवडत्या क्रिकेटपटूंपैकी एक, कोहलीसुध्दा ऊत्कृष्ट – सर विवियन रिचर्ड्स
3 राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेदरम्यान महाराष्ट्राच्या नेटबॉलपटूचा मृत्यू
Just Now!
X