News Flash

रात्रीस खेळ चाले

काळानुरूप गोष्टींमध्ये बदल घडायला हवेत, ते घडत नसतील तर ती गोष्ट कालबाह्य़ होते. असेच काहीसे कसोटी क्रिकेटच्या बाबतीतही घडताना दिसत होते

| July 5, 2015 04:09 am

रात्रीस खेळ चाले

काळानुरूप गोष्टींमध्ये बदल घडायला हवेत, ते घडत नसतील तर ती गोष्ट कालबाह्य़ होते. असेच काहीसे कसोटी क्रिकेटच्या बाबतीतही घडताना दिसत होते. त्यामुळेच आता कसोटी क्रिकेटला नव्या वेष्टनासहित समोर आणण्याचा प्रयत्न आयसीसी करताना दिसत आहे. त्यामुळे दिवस-रात्र कसोटी खेळण्याचा निर्णय घेण्यात आला आणि या नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या पारंपरिक प्रतिस्पध्र्यामध्ये पहिला दिवस-रात्र आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. पण हा प्रयोग कितपत यशस्वी होईल, याबद्दल मात्र कमालीची साशंकता आहे.
कसोटी हे क्रिकेटचे मूळ मानले जाते, पण जमाना बदलला. बर्गर, पिझ्झा कसाही असला तरी आपलासा वाटू लागला, तसेच क्रिकेटचेही. ट्वेन्टी-२०ने क्रिकेट नासवले, कसलेही आडवे-तिडवे फटके मारून क्रिकेट ओरबाडले जात असले तरी तीन तासांच्या सिनेमासारखे लोकांना ते आपलेसे वाटू लागले. पण ज्यामध्ये खरा खेळ कळतो, खेळाडूचा कस लागतो ते कसोटी क्रिकेट मात्र लोकांना वेळखाऊ वाटायला लागले. चाहत्यांची रुची बदलली, स्तर ढासळला. त्यामुळे लोकांच्या आवडी-निवडीला प्राधान्य देत आयसीसीने आता कसोटी क्रिकेटचा चेहरामोहरा बदलण्याचे ठरवले आणि त्यासाठीच दिवस-रात्र कसोटी क्रिकेटचा घाट घातला जात आहे.
कसोटी क्रिकेट नीरस, कंटाळवाणे होत आहे का, तर नक्कीच नाही. ट्वेन्टी-२० क्रिकेट, ग्लोबल वॉर्मिग, त्यामुळे बदललेले वातावरण आणि बदललेल्या खेळपट्टय़ा यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये कसोटी क्रिकेट अधिक निकाली लागताना दिसत आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये जवळपास ६० टक्के सामने निकाली लागले आहेत. या वर्षी आतापर्यंत १५ कसोटी सामन्यांपैकी ११ सामने निकाली लागले असून ही आकडेवारीच सारे काही दर्शवते आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेटमुळे कसेही फटके मारून झटपट धावा जमवल्या जाऊ लागल्या, त्याचा परिणाम कसोटी क्रिकेटमध्येही पाहायला मिळायला लागला आणि कसोटी क्रिकेटमधील रम्यता संपली आहे. दिवसाला ३००-४०० धावा सहज होऊ लागल्या. ग्लोबल वॉर्मिगमुळे वातावरण बदलले आणि त्याचाही धावगतीवर परिणाम व्हायला लागला. खेळपट्टीमध्ये अधिक जिवंतपणा राहिला नसल्याने खेळपट्टय़ा पाटा व्हायला लागल्या आणि गोलंदाज पुन्हा एकदा हतबल होताना दिसले. काही सामन्यांमध्ये गोलंदाजांनी जास्त बळी मिळवले, पण ते चेंडू खरेच दर्जेदार होते का, हे पाहिल्यावर नक्कीच कळेल.
कसोटी क्रिकेट अधिक रंजक करण्यासाठी काही वर्षांपूर्वी दोन्ही डावांमध्ये षटकांची बंधने घालण्याचा विचार करण्यात आला. हा विचार करताना कसोटी क्रिकेट रंजक झाले तरी त्याचा आत्मा हरवेल, याची भीती जाणकारांना वाटत आहे. असे केल्यास एकदिवसीय क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटमध्ये जास्त फरक राहणार नाही. खेळाडूंना मुक्तपणे खेळता येणार नाही. षटकांची सक्ती आल्यावर तिथे खेळाबाबत आसक्तीही राहणार नाही. या सामन्यामध्ये गुलाबी चेंडू वापरण्यात येणार आहे, पण त्याने नेमका कोणता मोठा फरक पडणार, हे कुणीही सांगताना दिसत नाही. सध्या एकदिवसीय दिवस-रात्र सामन्यांमध्ये सफेद रंगाचा चेंडू वापरतात, त्यामध्ये कोणताही दोष नाही, मग हा रंगबदलूपणा कशासाठी? सर्वात मोठी समस्या रात्री येऊ शकते, कारण रात्री दव पडल्यावर चेंडू सहजपणे बॅटवर येतो, त्याच वेळी चेंडू गोलंदाजाच्या हातून सटकताना दिसतो. यावर आयसीसी काही करणार आहे का? कारण संध्याकाळनंतर दव पडल्यावर फलंदाजांसाठी हा सामना कुरण असेल. मनसोक्त फलंदाजी करत त्यांना धावांचे डोंगर उभारता येतील, पण काही दिवसांपूर्वी आयसीसीने क्रिकेट समतोल होण्यासाठी आणि फलंदाजधार्जिणे न राहण्यासाठी गोलंदाजांच्या बाजूने काही नियम केले, मग अशा वेळी दिवस-रात्र कसोटी क्रिकेट खेळून गोलंदाजांना मृत्यूच्या खाईत लोटण्याचा प्रयत्न कशासाठी?
सध्याच्या घडीला आयसीसी भांडावून गेलेली दिसते. त्यांना काहीही करून आम्ही कसोटी क्रिकेट वाचवण्यासाठी त्यामध्ये काही बदल करत आहोत, हे दाखवून द्यायचे आहे. त्यासाठीच त्यांनी त्यामध्ये काही बदल करायचे ठरवले असले तरी त्यामुळे खेळाला धक्का लागतोय का, हे त्यांनी चाचपलेले दिसत नाही. आयसीसीने घातलेला हा घाट कसोटी क्रिकेटच्या मुळावर तरी येणार नाही ना, हे पाहावे लागेल. कसोटी क्रिकेट कितीही रंजक झाले तरी चाहते म्हणवणाऱ्यांना त्याच्याशी काहीही घेणेदेणे नाही. भारतामध्ये क्रिकेटला धर्म वैगेरे म्हटले जाते, पण इथे आयपीएलला स्टेडियम हाऊसफुल्ल होते, तर रणजी सामने पाहायला ५० प्रेक्षकही दिसत नाही. मुळात क्रिकेटचा दर्दी चाहताच लुप्त होत चालला आहे. कसोटी क्रिकेट ग्लॅमरस केल्यावर स्टेडियम हाऊसफुल्ल होतील, हे बोलणे अति धाडसाचे ठरेल. जिथे देशासाठी खेळण्यापेक्षा लीग क्रिकेटला वरचा दर्जा दिला जातो तिथेच खेळाडूंचा आणि चाहत्यांचा दर्जा कळतो. नवीन गोष्टींचे स्वागत करायलाच हवे, बदल स्वीकारायला हवेत, पण ते किती व्यवहार्य आहेत हे पडताळून पाहायला हवे. या नव्या दिवस-रात्र क्रिकेटमध्ये आयसीसीची कसोटी लागणार आहे. या कसोटीमध्ये ते किती खरे उतरतील, हे सांगणेच न बरे.

यापूर्वी १९९६-९७ साली रणजी क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना दिवस-रात्र खेळवण्यात आला होता आणि तो मुंबईने पहिल्या डावाच्या आधारावर जिंकला होता. ग्वाल्हेरमध्ये झालेल्या या सामन्यात पहिल्या डावात मुंबईने ६३० धावांचा डोंगर उभारला होता, तर दिल्लीचा पहिला डाव ५५९ धावांमध्ये आटोपला होता.

prasad.lad@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2015 4:09 am

Web Title: changes in cricket
टॅग : Changes
Next Stories
1 वागळे की दुनिया
2 पुरुषांची आज इंग्लंडविरुद्ध लढत
3 सेप ब्लाटर यांच्या अनुपस्थितीत महिला विश्वचषकाची अंतिम लढत
Just Now!
X