News Flash

जागतिक स्पर्धेला जाण्यापासून रोखले होते!

भारतीय भालाफेकपटू दविंदरसिंग कांगकडून धक्कादायक माहिती

| August 17, 2017 02:11 am

भारतीय भालाफेकपटू दविंदरसिंग कांग

भारतीय भालाफेकपटू दविंदरसिंग कांगकडून धक्कादायक माहिती; ‘एएफआय’कडून खंडन

लंडन येथे नुकत्याच झालेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भालाफेक प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश करून ऐतिहासिक कामगिरीची नोंद करणाऱ्या भारतीय दविंदरसिंग कांगने बुधवारी धक्कादायक माहिती दिली. भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने (एएफआय) जागतिक स्पर्धेत मला जाण्यापासून रोखले होते, असे दविंदरने म्हटले आहे.

दविंदरवर उत्तेजक सेवन केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. मात्र, त्याच्या शरीररामध्ये सापडलेले उत्तेजक हे खेळासाठी घातक नसल्याचे निष्पन्न झाले होते. उत्तेजकाचा ठपका ठेवल्यामुळे दविंदरला जागतिक स्पर्धेत न पाठवण्यासाठी एएफआय प्रयत्नशील असल्याचे म्हटले जात होते, पण एएफआयने हा दावा फेटाळून लावला. पण दुसरीकडे देशाची नाचक्की होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.

जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्रावर भारतीयांच्या आशा असताना दविंदरने अविश्वसनीय कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली. मात्र त्याला पदक पटकावण्यात अपयश आले. मे महिन्यात इंडियन ग्रां. प्रि. स्पर्धेत राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने (नाडा) घेतलेल्या चाचणीत दविंदरच्या नमुन्यात ‘मरिजुयाना’ या प्रतिबंधित द्रव्याचे अंश सापडले होते. मात्र, जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेच्या (वाडा) नियमानुसार कारवाई अनिवार्य नसल्यामुळे दविंदरचे निलंबन करण्यात आले नाही.

‘‘मी ज्या दिवशी लंडनला जाण्यासाठी निघालो होतो त्या दिवशी एएफआयच्या अधिकाऱ्यांनी मला जागतिक स्पर्धेत सहभाग घेऊ नकोस असे सांगितले. आंतरराष्ट्रीय संघटना तुझी तपासणी करेल आणि कदाचित तुझ्यावर बंदीची कारवाईही होईल, असे त्यांच्याकडून मला सांगण्यात आले,’’ असे दविंदर म्हणाला.

त्याने पुढे सांगितले की, ‘‘मला काय करावे हेच कळत नव्हते. मी खोलीत बसून रडत होतो, परंतु काही लोकांकडून सल्ला घेतल्यानंतर मी स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि भालाफेक प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा मी पहिला भारतीय ठरलो.’’

दरम्यान, एएफआयने दविंदरचा दावा खोडून काढला. एखाद्या स्पर्धेत खेळाडूने सहभाग घ्यावा किंवा नाही, या गोष्टीचा निर्णय महासंघ घेऊ शकतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तेजकामुळे देशाचे नाव मलिन होऊ नये यासाठी एएफआयने प्रयत्न केल्याचे, अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी सांगितले. ‘मरिजुयाना या प्रतिबंधित द्रव्याचे सेवन केल्याप्रकरणी दविंदर दोषी आढळला होता. पण असे असले तरी त्याच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकत नव्हती़. दविंदरला ‘नाडा’च्या समितीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले होते. आम्ही त्याच्या तात्पुरत्या निलंबनासाठी विनंती केली आणि नियमानुसार आम्हाला तसे करता येते. तरीही त्याला आम्ही जागतिक स्पर्धेसाठीच्या संघात निवडले, परंतु त्याला आम्ही स्पर्धेत न खेळण्याची विनंती केली. त्यामुळे आमच्या विनंतीमुळे त्याला मानसिक त्रास झाला असे जर तो म्हणत असले तर त्यामध्ये काहीच तथ्य नाही,’’ असे सुमारीवाला यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 2:09 am

Web Title: davinder singh kang on afi
Next Stories
1 कबड्डीपटू लवकरच कोटय़धीश होईल  -प्रदीप
2 १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषकाला ५० दिवसांचा अवधी शिल्लक
3 Pro Kabaddi Season 5 – हरियाणाची तामिळ थलायवाजविरुद्ध बरोबरी, गुजरातचा विजयी धडाका सुरुच
Just Now!
X