ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये धावा होणे महत्त्वाचे असते, त्या कशा होतात या गोष्टीला फारसे महत्त्व दिले जात नाही. त्यामुळेच ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये अपारंपरिक फटके आपल्याला पाहायला मिळतात. यामधलाच एक फटका म्हणजे ‘दिलस्कूप’.

श्रीलंकेचा सलामीवीर तिलकरत्ने दिलशानने लेग साइडवरून यष्टय़ांच्या मागे फटका मारण्याचा शोध लावला आणि तो ‘दिलस्कूप’ या नावाने प्रचलित झाला. या फटक्याचा शोध नेमका कसा लागला, याचे गुपित दिलशानने उलगडले.

‘‘आयपीएलचा दुसरा हंगाम दक्षिण आफ्रिकेत खेळवला गेला. त्या वेळी अ‍ॅडम गिलख्रिस्ट एका मध्यमगती गोलंदाजाचे चेंडू झेलण्यासाठी यष्टय़ांजवळ उभा होता. त्या वेळी मधल्या यष्टीवर पडलेला एक चेंडू मी पॅडल स्वीप केला. या फटक्यावर मला चौकार मिळाला, पण गिलख्रिस्ट ग्लोव्ह्ज आपटत यष्टय़ांपासून लांब उभा राहिला. त्या वेळी मी विचार केला की, हा फटका जर उंचावरून मारला असता तर हमखास चौकार किंवा षटकारही मिळू शकतो आणि त्या वेळी मला हा फटका सुचला,’’ असे दिलशानने सांगितले.

तो पुढे म्हणाला की, ‘‘बराच काळ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळल्यावर तुमच्या खेळाचा प्रतिस्पर्धी चांगलाच अभ्यास करतात. त्यामुळे काही तरी नवीन करणे भाग असते. त्यामुळेच हा फटका मला सुचला. हा फटका शोधल्यावर माझ्या धावाही चांगल्या झाल्या. २००९ साली मला दोनदा मालिकावीराचा पुरस्कारही मिळाला.’’

या फटक्याचाही प्रतिस्पध्र्यानी अभ्यास केल्यावर काय करणार, असे विचारल्यावर दिलशानकडे उत्तर तयारच होते. तो म्हणाला की, ‘‘प्रतिस्पर्धी गोलंदाजाने ‘दिलस्कूप’ फटक्याचा अभ्यास केल्याचे समजताच मी ‘रिव्हर्स स्वीप’ खेळायचा प्रयत्न करतो किंवा ‘स्विच हीट’चा फटका मारायला पसंती देतो.’’

या फटक्याला कसा प्रतिसाद मिळतो, असे विचारल्यावर दिलशान म्हणाला की, ‘‘या फटक्याला फार लोकप्रियता मिळाली आहे. आयपीएल किंवा काही आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान बरेच युवा खेळाडू हा फटका शिकण्यासाठी माझ्याकडे येतात. क्रिकेटच्या पारंपरिक फटक्यांचा मी आदर करतो, पण ‘दिलस्कूप’मुळे  खेळाचे नुकसान होत नाही, असे मला वाटते.’’