करोनानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे कसोटीच्या रूपाने पुनरागमन झाले. इंग्लंड-वेस्ट इंडिज पहिली कसोटी मालिका पार पडल्यानंतर ३० जुलैला सुमारे साडेचार महिन्यांनी वन डे सामनादेखील खेळण्यात आला. इंग्लंडने पहिल्या वन डे सामन्यात आयर्लंडवर ६ गडी राखून विजय मिळवला आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. याचसोबत ICC Men’s Cricket World Cup Super League स्पर्धेत १० गुणांसह आपले खाते उघडले. पण सामन्यानंतर चर्चा मात्र आयर्लंडच्या कर्टीस कॅम्फरची दिसून आली.

इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करत आयर्लंडचा डाव १७३ धावांत संपवला. इंग्लंडच्या डेव्हिड विलीने आयर्लंडला चांगलाच दणका देत 30 धावांत ५ बळी टिपले. पण आयर्लंडकडून आपला पदार्पणाचा सामना खेळणारा कर्टीस कॅम्फर याने एक बाजू लावून धरत दमदार खेळी केली. त्याने ४ चौकारांसह नाबाद ५९ धावा केल्या. तसेच इंग्लंडच्या डावात त्याने ५ षटकं टाकून १ बळी टिपला. त्यामुळे आपल्या पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक आणि किमान एक गडी मिळवणे अशी दुहेरी कामगिरी करणारा तो केवळ १७ वा खेळाडू ठरला.

दरम्यान, १७४ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने ६ गडी राखून सामना जिंकला. विकेट्स राखून पार केले. जेसन रॉय (२४) आणि जेम्स विन्स (२५) चांगली सुरूवात मिळाल्यानंतर बाद झाले. त्यानंतर सॅम बिलिंग्सने नाबाद अर्धशतक (६७) ठोकत इंग्लंडला विजय मिळवून दिला. इंग्लंडने २७.५ षटकात सामना जिंकला आणि ICC Men’s Cricket World Cup Super League मध्ये आपले गुणांचे खाते उघडले.