यजमान इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात चांगली सुरूवात केली. इंग्लंडचा कर्णधार जो रुट याने दुसऱ्या कसोटीसाठी संघात पुनरागमन करत कर्णधारपदाची सूत्र हातात घेतली. कर्णधार जो रुटच्या पुनरागमनासोबतच अनुभवी स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस वोक्स आणि सॅम करन यांना वेगवान गोलंदाजाना संघात स्थान दिलं. तर शिस्तभंगाच्या कारवाईमुळे जोफ्रा आर्चरने संघातलं स्थान गमावलं. पहिल्या दिवसाच्या खेळात वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याने सामना सुरू असताना एक असा निर्णय घेतला की त्यामुळे त्याला थेट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडून पावती मिळाली.

नाणेफेक जिंकत वेस्ट इंडिजने प्रथम गोलंदाजीची निवड केली. त्यानंतर पहिल्या दिवसअखेर इंग्लंडने ३ गड्यांच्या मोबदल्यात २०७ धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडने सामन्यात काही बदल केले. सामन्याला सुरुवातीला इंग्लंडने सावध पवित्रा घेतला. पहिल्या कसोटीत दाणादाण उडवणाऱ्या होल्डर – गॅब्रिअल जोडीचा फलंदाजांनी संयमाने सामना केला. पण चेंडूला गती आणि उसळी कमी मिळत असल्याने होल्डरने अपेक्षेपेक्षा लवकर फिरकीपटूंना गोलंदाजी दिली. होल्डरच्या या निर्णयाने सचिनही खूश झाला.

 

View this post on Instagram

 

Jason Holder’s decision at the toss has Sachin’s tick of approval

A post shared by ICC (@icc) on

“सामन्याच्या पहिल्या सत्रात वेगवान गोलंदाजांनी टाकलेल्या चेंडूंपैकी काही चेंडू हे किपरच्या हातात थेट पोहोचू शकले नाहीत ही बाब मी पाहिली. खेळपट्टीवर ओलावा आहे हे यावरून स्षष्ट होतं. अशा वेळी होल्डरने मात्र लवकर फिरकीपटूंना गोलंदाजी सोपवत एकदम ‘स्मार्ट’ काम केलं. अशा खेळपट्टीवर फिरकीपटू नक्कीच यशस्वी ठरतील”, असं ट्विट सचिनने केलं आणि होल्डरच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

दरम्यान, रोस्टन चेसने रॉरी बर्न्स (१५) आणि झॅक क्रॉली (०) यांना लागोपाठ बाद करत दोन बळी घेतले. चेसची हॅटट्रीकची संधी कर्णधार जो रुटने हुकवली. कर्णधार जो रुट खेळपट्टीवर स्थिरावतोय असं वाटताच अल्झारी जोसेफने अप्रतिम स्विंग गोलंदाजी करत त्याला २३ धावांवर माघारी धाडलं. त्यामुळे इंग्लंड ३ बाद ८१ अशा स्थितीत होता. त्यानंतर सलामीवीर डॉम सिबली ( (नाबाद ८६) आणि बेन स्टोक्स (नाबाद ५९) यांनी विंडीजच्या डाव सावरला. शतकी भागीदारी करत त्यांनी इंग्लंडला दिवसअखेर द्विशतक गाठून दिले.