वैयक्तिक पुरस्कारांना वाटाण्याच्या अक्षता * मनोरमाबाई आपटे मुलींची क्रिकेट स्पर्धा
ऋषिकेश बामणे, मुंबई</strong>
आंतरराष्ट्रीय स्तरावर एकीकडे महिला क्रिकेट प्रसिद्धीझोतात आले असतानाच दुसरीकडे मनोरमाबाई आपटे चषक मुलींच्या शालेय क्रिकेट स्पर्धेला मात्र सोमवारी वादाचे गालबोट लागले. उपांत्य फेरीचा सामना आटोपल्यानंतर दोन तासांच्या अंतराने भर दुपारी अंतिम सामना खेळवण्यात आल्याने महिला क्रिकेटपटूंची पुरती दमछाक झाली. त्यामुळे स्पर्धेच्या वेळापत्रकावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यातच खेळाडूंसाठी वैयक्तिक पुरस्कार न देण्यात आल्याने स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंचा हिरमोड झाला. त्यामुळेच पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या क्रिकेटला कमी लेखल्याची भावना यावेळी उपस्थित क्रीडारसिक व पराभूत संघाच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केली.
एका दिवशी दोन सामने खेळवणे अनिवार्य असल्याने या स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना व अंतिम सामना सोमवारीच खेळवण्याचा पर्याय आयोजकांसमोर होता. सकाळी उपांत्य सामना आटोपल्यावर दोन तासांच्या अंतराने म्हणजेच दुपारी २ वाजता अंतिम सामना रंगला. परंतु स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात विजयी चषकाव्यतिरिक्त अन्य एकही वैयक्तिक पुरस्कार नसल्यामुळे खेळाडूंच्या पालकांमध्ये व प्रशिक्षकांमध्ये काहीशी नाराजी पसरली होती.
मुलांच्या क्रिकेटमध्ये सर्वोत्तम क्रिकेटपटूंचे तिन्ही पुरस्कार प्रदान करण्यात येतात, मात्र मुलींच्या स्पर्धेमध्ये कुठेतरी भेदभाव होत आहे. त्याशिवाय एकाच दिवशी उपांत्य व अंतिम सामन्याचे आयोजन केल्यामुळे आमच्या संघातील खेळाडूंची दमछाक झाली. १६ वर्षांखालील मुलींना एकाच दिवशी २०-२० षटकांचे दोन सामने खेळवणे वाटते तितके सोपे नाही. त्यामुळे पुढील वेळेपासून आयोजकांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावे.
इव्हान रॉड्रिग्ज, सेंट कोलंबा शाळेचे प्रशिक्षक
गतवर्षीसुद्धा स्पर्धेतील सवरेत्कृष्ट खेळाडू, फलंदाज, गोलंदाज असे पुरस्कार काही दिवसांच्या कालावधीने जाहीर केले होते. त्यामुळे यंदाही ते मिळतील, अशी अपेक्षा आहे.
तनिशा गायकवाड, शारदाश्रम शाळेची कर्णधार
आम्हीही गतवर्षी एकाच दिवशी उपांत्य व अंतिम सामना खेळलो होतो. मात्र त्यामुळे आयोजकांवर बोट दाखवता येणार नाही. शालेय स्तरावरील महिला क्रिकेटला आता फार चांगल्या सोयीसुविधा मिळत आहेत. त्याशिवाय पालकांच्या व शाळेच्या सहकार्यामुळे येणाऱ्या काळात या स्पर्धामधील संघांची संख्या अधिक वाढेल, अशी खात्री आहे.
विवेक पोडनकर, शारदाश्रम शाळेचे प्रशिक्षक
महिला क्रिकेट सामन्याचे सर्वोत्तम नियोजन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मुख्य म्हणजे खेळाडूंनी किंवा प्रशिक्षकांनी वैयक्तिक पुरस्कारांऐवजी संघ जिंकला, या गोष्टीला अधिक महत्त्व दिले पाहिजे. हॅरिस-गाइल्स शिल्डसारख्या स्पर्धाप्रमाणेच महिलांच्या स्पर्धेसाठीसुद्धा आम्ही नामांकित माजी क्रिकेटपटू किंवा मान्यवरांना पुरस्कार सोहळ्यासाठी आमंत्रित करतो. त्यांच्याकडून आपले कौतुक होणे, हाच खरे तर खेळाडूंसाठी पुरस्कार असायला हवा.
नदीम मेमन, मुंबई शालेय ( क्रीडा संघटनेचे सचिव)
शारदाश्रम विद्यामंदिरला विजेतेपद ; अंतिम सामन्यात सेंट कोलंबा शाळेवर ५१ धावांनी मात
मरिन लाइन्स येथील इस्लाम जिमखान्याच्या मैदानावर भर उन्हात रंगलेल्या मनोरमाबाई आपटे कुमारी गट (१६ वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दादरच्या शारदाश्रम विद्यामंदिर इंग्रजी माध्यम शाळेने ग्रँट रोडच्या सेंट कोलंबा शाळेवर ५१ धावांनी विजय मिळवून अजिंक्यपदाला गवसणी घातली.
प्रथम फलंदाजी करताना शारदाश्रमचा डाव १९.४ षटकांत १३४ धावांत संपुष्टात आला. केतकी धुरे (नाबाद ७२) व कर्णधार तनिशा गायकवाड (१७) यांनी फलंदाजीत सुरेख योगदान दिले. प्रत्युत्तरात सेंट कोलंबा संघ २० षटकांत नऊ फलंदाजांच्या मोबदल्यात ८३ धावाच करू शकला. गोलंदाजीत पाच बळी मिळवणाऱ्या तुशी शाहने फलंदाजीतही ५० धावा केल्या, मात्र इतर फलंदाजांकडून तिला अपेक्षित साथ लाभली नाही. शारदाश्रमतर्फे निर्मिती राणेने सर्वाधिक चार बळी मिळवले.