डॉ. प्रकाश परांजपे

चित्रात आधीच्या लेखातील तंत्रकुटाचा संपूर्ण डाव दिला आहे. ठेका ६ बिनहुकमीचा आहे.  ६ बिनहुकमीचा ठेका म्हणजे ६+६=१२ दस्त जिंकण्याची जबाबदारी. एकूण पाने १३ म्हणजे डावातले एकूण दस्त १३. त्यापैकी १२ दस्त जर जिंकायचे असतील तर प्रतिपक्षाला १ पेक्षा जास्त दस्त जिंकू देऊन चालणार नाही.

चित्रात उ-द जोडीकडे इस्पिक, बदाम आणि किलवर या पंथात खणखणीत नाणी आहेत, या तिन्ही पंथाचे एक्के -राजे आहेत, इस्पिकची राणीसुध्दा आहे. मात्र दक्षिणेच्या खेळाडूकडे या पंथाची आणखी पानं नाहीत. या तीन पंथांमध्ये दक्षिणेला फक्त सात दस्तच जिंकता येतील. उरलेले पाच दस्त चौकट पंथाच्या सहा पानांमधून जमा केले पाहिजेत.

चौकटची चार पानं गावात आहेत, त्यात राणी-गुलाम ही दोन चित्रं आहेत. त्यापैकी एकाला दस्त जिंकू दिला तर चालण्यासारखं आहे, पण दोन दस्त हरणं परवडणार नाही. निष्काळजीपणे इतर एक्का-राजा जर आधीच वाजवले आणि मग चौकटकडे मोर्चा वळवला तर चौकटचा दस्त जिंकून प्रतिस्पधर्््यना त्या इतर पंथाचा दस्त जिंकता येईल. कारण डाव बिनहुकमी आहे. त्यामुळे इतर पक्षातले एक्का—राजा हे त्या पक्षाचा ताबा म्हणून, त्या पंथातलं वजन म्हणून उपयोगात आणले पाहिजेत. त्यामुळे पहिली उतारी इस्पिक एक्क्याने जिंकून थेट चौकट खेळणं हाच उत्तम मार्ग आहे.

चित्रामध्ये प-पू  जोडीकडे असलेली चौकटची  चार पानं वेगवेगळ्या प्रकारे कशी विभागलेली असू शकतील ते डाव्या बाजूला पाच ओळींमध्ये मराठी शब्दांत  दाखविलं आहे.  जर दुसऱ्या ओळीत दाखविल्याप्रमाणे ही  विभागणी २-२ अशी असेल चौकट एक्का-राजा या दोन चित्रांखाली ती पानं पडतील आणि चौकटची उरलेली पानं सर होतील. त्या परिस्थितीत उ-द जोडी १३ च्या १३ दस्त सहजपणे जिंकू शकेल. जर विभागणी ३-१ किंवा १-३ अशी असेल तर एक्का-राजा वाजविल्यानंतर एक चित्र प-पू जोडीकडं शिल्लक राहिला आणि त्या चित्राला एक दस्त द्यावाच लागेल. उ-द जोडीचे १२ दस्त होतील आणि ठेका यशस्वी होईल. मात्र चौथ्या किंवा पाचव्या ओळीत दाखविल्याप्रमाणे विभागणी ४-० असेल तर चौकट पंथ थोडा काळजीपूर्वक खेळावा लागेल.

समजा तुम्ही हातातून चौकट चव्वी  खेळलात, आणि पश्चिमेने तिरी दिली, तर पानांची विभागणी ४-० असेल तर घात  होऊ नये म्हणून बघ्याच्या हातातून राजा खेळून चालणार नाही,  पंजी किंवा दश्शी खेळून ‘सुरक्षित पवित्रा‘ घ्यावा लागेल. जर पूर्वेकडे, म्हणजे उजव्या हाताच्या खेळाडूंकडे चौकटचं पान असेल तर चौकटची विभागणी ४-० नाही ह्यची खात्री होईल. तो दस्त प-पू जोडी जिंकेल कदाचित, पण उरलेले सगळे दस्त जिंकून उ-द जोडीचा ठेका यशस्वीपणे पूर्ण होईल. जर पूर्वेकडे चौकटचं पण नसेल तर हा दस्त दक्षिण स्वस्तात जिंकेल आणि मग चौकटचे  एक्का—राजा वाजवून चौकटच्या चौथ्या फेरीचा एक दस्त पश्चिमेला देऊन दक्षिण उरलेले बारा हात जिंकून ठेका वटवू  शकेल.

panja@demicoma.com

(आंतरराष्ट्रीय ब्रिज तज्ज्ञ, लेखक, समालोचक, खेळाडू, प्रशिक्षक)