भारतीय फलंदाजीची भिंत म्हणून कारकीर्द घडणवणारा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याला १ नोव्हेंबर २०१८ मध्ये ICC च्या Hall of Fame मध्ये समाविष्ट करण्यात आले. भारत विरुद्ध विंडीज यांच्यात पाचवा सामना केरळची राजधानी त्रिवेंद्रम येथे सुरु होता. त्या सामन्यातील दिवसाच्या खेळाआधी माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या हस्ते राहुल द्रविडला हा सन्मान प्रदान करण्यात आला. क्रिकेट जगतातील हा एक प्रतिष्ठेचा समजला जाणारा सन्मान आहे. पण याची ICC च्या अधिकृत संकेतस्थळावर नोंद करताना मात्र ICC व्यवस्थापानाने एक मोठी चूक केली. त्या चूकीमुळे त्यांच्यावर नेटिझन्सने टीकेचा भडिमार केला.

ICC च्या अधिकृत संकेतस्थळावर Hall of Fame हा एक वेगळा विभाग आहे. त्या विभागात आतापर्यंत ज्या खेळाडूंना Hall of Fame मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे, त्यांची माहिती लिहीलेली आहे. त्यात राहुल द्रविड याच्याबद्दल माहिती देताना तो डावखुरा फलंदाज असल्याचे नोंदवण्यात आले.

त्यांच्या या चुकीमुळे ICC वर नेटिझन्स चांगलेच संतापले. एवढ्या मोठ्या खेळाडूचा सन्मान केल्यानंतर त्याच्याबद्दल महत्वाची माहिती चुकीची लिहिणे नेटिझन्सला अजिबातच रूचले नाही. त्यामुळे नेटिझन्सने ICC ला चांगलेच धारेवर धरले.

दरम्यान, द्रविडने कसोटी कारकिर्दीत १३ हजारांहून अधिक आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० हजारांहून अधिक धावा केल्या होत्या.