भारताविरूद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसअखेर ५ गड्यांच्या मोबदल्यात २७४ धावा केल्या. मार्नस लाबूशेनचे शानदार शतक आणि मॅथ्यू वेडची ४५ धावांची खेळी याच्या जोरावर यजमान संघाला पहिल्या दिवशी अडीचशेपार मजल मारता आली. भारताकडून कसोटी पदार्पण करणाऱ्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. टी नटराजनने २ बळी टिपले. तर वॉशिंग्टन सुंदरला स्टीव्ह स्मिथच्या रूपात आपला पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी बळी मिळाला.

आणखी वाचा- IND vs AUS: नटराजनची पहिल्याच कसोटीत भुवनेश्वर कुमारच्या विक्रमाशी बरोबरी

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांच्या सलामीवीरांनी तो निर्णय चुकीचा ठरवल. डेव्हिड वॉर्नर एका धावेवर तर मार्कस हॅरिस ५ धावांवर माघारी परतला. त्यानंतर मार्नस लाबूशेन आणि स्टीव्ह स्मिथ या अनुभवी जोडी यजमानांचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केली. स्मिथ ३६ धावांवर बाद झाला. पण लाबूशेनने मॅथ्यू वेडच्या साथीने डाव दोनशेपार पोहोचवला.

Video: दणक्यात पदार्पण! स्मिथला बाद करण्यासाठी सुंदरने लढवली शक्कल अन्…

मॅथ्यू वेड आणि लाबूशेन यांच्यात शतकी भागीदारी झाली, पण वेडला अर्धशतक करता आले नाही. ४५ धावांवर तो माघारी परतला. त्याने सहा चौकार ठोकले. त्यानंतर मार्नस लाबूशेनने आपलं दमदार शतक पूर्ण केलं. आधीच्या सामन्यांमध्ये त्याला शतक करता आलेलं नव्हतं, पण या सामन्यात त्याने शतक झळकावलं. शतक पूर्ण झाल्यावर फटकेबाजी करताना तो १०८ धावांवर झेलबाद झाला. लाबूशेनने २०४ चेंडू खेळत ९ चौकार खेचले. त्यानंतर कर्णधार टीम पेन आणि कॅमेरॉन ग्रीन या जोडीने दिवसाचा खेळ संपेपर्यंत चांगला खेळ केला. ग्रीन २८ तर पेन ३८ धावांवर नाबाद खेळत आहेत. भारताकडून नटराजनने दोन तर सिराज, सैनी आणि सुंदरने १-१ बळी टिपला.

सैनी दुखापतग्रस्त

आणखी वाचा- IND vs AUS: नटराजनने मैदानात उतरताच रचला इतिहास; ‘असा’ पराक्रम करणारा पहिलाच भारतीय

नवदीप सैनी स्वत:चे ८वे षटक टाकत होता. षटकाचा अखेरचा चेंडू टाकताना नवदीप सैनीच्या मांडीच्या स्नायूंवर ताण आला. त्यामुळे त्याने गोलंदाजी थांबवली. प्रथमोपचार घेऊन तो मैदानात काही काळ क्षेत्ररक्षण करत होता. पण वेदना असह्य झाल्याने त्याला मैदानाबाहेर नेण्यात आलं. तेथून तो हॉस्पिटलला रवाना झाला. त्याला दुखापतीनंतर स्कॅनसाठी नेण्यात आलं आहे. त्यामुळे भारताच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे.