ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. तिसऱ्या दिवसाच्या खेळात जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांच्या भेदक माऱ्यासमोर भारताचा दुसरा डाव ३६ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी मिळालेलं ९० धावांचं आव्हान त्यांनी ८ गडी राखून पूर्ण केलं.

सलामीवीर मॅथ्यू वेड आणि जो बर्न्स यांनी दुसऱ्या डावात पहिल्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केली. ही जोडी ऑस्ट्रेलियाला एकहाती विजय मिळवून देईल असं वाटत असतानाच…आश्विनच्या गोलंदाजीवर मॅथ्यू वेड धावबाद झाला. यष्टीरक्षक वृद्धीमान साहाने यावेळी प्रसंगावधान राखत धोनी स्टाईलमध्ये वेडला बाद केलं. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धोनीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

वेड माघारी परतल्यानंतर मार्नस लाबुशेनही फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात आश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर स्टिव्ह स्मिथ आणि बर्न्स जोडीने ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या मालिकेतला दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून मेलबर्नच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.