आयपीएलच्या बाराव्या हंगामाच चेन्नई सुपरकिंग्ज संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा महत्वाचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो दुखापतीमुळे दोन आठवड्यांसाठी संघाबाहेर गेला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात ब्राव्होला दुखापत झाल्याची माहिती कर्णधार महेंद्रसिंह धोनीने दिली होती.

यानंतर चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाने ब्राव्होची वैद्यकीय चाचणी केली. या चाचणीत ब्राव्होच्या मांडीला गंभीर दुखापत झाल्याचं स्पष्ट झालं असून, उपचारासाठी त्याला दोन आठवडे संघाबाहेर जावं लागणार आहे. चेन्नईच्या संघाचे सहाय्यक प्रशिक्षक मायकल हसी यांनी ही माहिती दिली. “ब्राव्होचं संघात नसणं हा आमच्यासाठी मोठा धक्का आहे, मात्र संघ यातून लवकरच सावरेल याची आम्हाला खात्री आहे.” हसी पत्रकारांशी बोलत होते.

मुंबईविरुद्ध सामन्यात हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्ड यांनी ब्राव्होच्या अखेरच्या षटकात फटकेबाजी करत 29 धावा कुटल्या होत्या. त्याच्या याच षटकामुळे सामन्याचं पारडं चेन्नईकडून मुंबईकडे झुकलं. पहिल्या 3 सामन्यांमध्ये ब्राव्होने चेन्नईच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत चेन्नईचा संघ शार्दुल ठाकूर किंवा मोहित शर्मा यांच्यापैकी एका गोलंदाजाला अखेरच्या षटकांमध्ये संधी देण्याची शक्यता आहे.