बाराव्या हंगामाच्या पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जच्या झंजावातासमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ पुरता कोलमडला. फिरकीपटू इम्रान ताहीर, हरभजन सिंह, रविंद्र जाडेजा यांच्या जाळ्यात अडकलेला बंगळुरुचा संघ अवघ्या 70 धावांपर्यंत मजल मारु शकला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय चेन्नईच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. बंगळुरुकडून पार्थिव पटेलचा अपवाद वगळता एकही फलंदाज चेन्नईच्या गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. याच सामन्यात बंगळुरुच्या नावावर काही नकोशा विक्रमांची नोंद झालेली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ, आयपीएलच्या इतिहासात 75 धावसंख्येखाली तीन वेळा बाद होणारा पहिला संघ ठरला आहे. याआधी 2014 आणि 2017 साली बंगळुरुच्या संघावर अशी नामुष्की ओढवली होती.

याचसोबत 2008 साली आयपीएलच्या पहिल्या हंगामात पहिल्याच सामन्यात बंगळुरुने कोलकात्याविरुद्ध 82 या निचांकी धावसंख्येची नोंद केली होती. त्यानंतर 11 वर्षांनी बंगळुरुने पुन्हा एकदा सलामीच्याच सामन्यात निचांकी धावसंख्या नोंदवली आहे.

त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये विराट कोहलीचा बंगळुरु संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – …तर आयपीएल खेळणार नाही, पहिल्याच सामन्याआधी विराटचं मोठं वक्तव्य