घरच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला मुंबई इंडियन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला. एबी डिव्हीलियर्स आणि कर्णधार विराट कोहली यांनी मुंबईने दिलेल्या आव्हानाचा योग्य पद्धतीने पाठलाग करत चांगली झुंज दिली. मात्र मोक्याच्या क्षणी मुंबईने केलेलं कमबॅक आणि शेवटच्या चेंडूवर पंचांकडून झालेली चूक यामुळे बंगळुरुच्या हातातून सामना निसटला. मात्र या खेळीदरम्यान विराट कोहलीने आयपीएलमध्ये ५ हजार धावांचा टप्पा गाठला आहे.

अशी कामगिरी करणारा विराट कोहली आयपीएलच्या इतिहासातला दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी सुरेश रैनाने हंगामाच्या सलामीच्या सामन्यात अशी कामगिरी करुन दाखवली आहे. विराटने मुंबईविरुद्धच्या सामन्यात ४६ धावांची खेळी केली. त्याचं अर्धशतक ४ धावांनी हुकलं असलं तरीही विराटने आपल्या नावावर एका अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. कोणत्याही एका संघाकडून ५ हजार धावांचा टप्पा ओलांडणारा विराट पहिला फलंदाज ठरला आहे.

चेन्नई सुपरकिंग्जवर २ वर्षांची बंदी असताना सुरेश रैना गुजरात संघाकडून खेळत होता. त्यामुळे अजुनही चेन्नईकडून ५ हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी त्याला बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. मात्र विराटने या सर्वांना मागे टाकत या यादीमध्ये आपलं पहिलं स्थान मिळवलं आहे.

दरम्यान अखेरच्या चेंडूवर लसिथ मलिंगाचा नो-बॉल पंचांच्या नजरेतून सुटल्यामुळे विराट कोहलीने आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. बाराव्या हंगामात बंगळुरु आपल्या सलामीच्या दोन्ही सामन्यात हार पत्करावी लागली आहे. त्यामुळे आगामी सामन्यात विराट कोहलीचा हा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.