बेंगळूरुविरुद्ध कोलकाताचे भवितव्य वेस्ट इंडिजच्या अष्टपैलू खेळाडूवर

 कोलकाता : आठ सामन्यांपैकी सात सामन्यांत पराभव आणि एकमेव विजय, ही रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुची इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमधील कामगिरी. त्यामुळे बेंगळूरुला आव्हान टिकवायचे आहे, तर कोलकाता नाइट रायडर्सला सलग तीन पराभवांची मालिका खंडित करायची आहे. सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असणाऱ्या आंद्रे रसेलला दुखापत झाल्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या सामन्यासाठी कोलकाताच्या चिंतेत भर पडली आहे.

कोलकाताने यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये झोकात सुरुवात केली. परंतु दुसऱ्या क्रमांकावरील हा संघ आता सहाव्या क्रमांकावर फेकला गेला. त्यामुळे कोलकाताला हरवणे बेंगळूरुकरिता कठीण जाणार नाही. संघाच्या सरावाप्रसंगी रसेलच्या खांद्याला उसळणारा चेंडू लागल्यामुळे दुखापत झाली आहे. त्याआधी चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात स्नायूंना दुखापत झाल्यामुळे तो प्रथमच अपेक्षेनुरूप कामगिरी दाखवू शकला नव्हता.

यंदाच्या हंगामात बेंगळूरुविरुद्धच्या पहिल्या लढतीत रसेलनेच विजयाचा घास बेंगळूरुच्या तोंडातून हिरावला होता. बेंगळूरुने प्रथम फलंदाजी करताना उभारलेले २०६ धावांचे अवघड आव्हान रसेलने १३ चेंडूंत सात उत्तुंग षटकारांसह उभारलेल्या नाबाद ४८ धावांच्या वेगवान खेळीमुळे कोलकाताने सहज पेलले. रसेलच्या अनुपस्थितीचा कोलकाताला फटका बसू शकेल. कारण या संघाला बाद फेरी गाठण्यासाठी उर्वरित सहा सामन्यांपैकी चार विजयांची आवश्यकता आहे.

दुसरीकडे, बेंगळूरुच्या फलंदाजीचे आधारस्तंभ विराट कोहली आणि एबी डी’व्हिलियर्स सातत्यपूर्ण धावा करीत आहेत. परंतु सांघिक समतोल न साधला गेल्याचे प्रकर्षांने दिसून येत आहे. वेगवान माऱ्याचे अपयश संघासाठी मारक ठरत आहे. युवा गोलंदाज नवदीप सैनी चोख कामगिरी बजावत आहे, मात्र अनुभवी उमेश यादव पूर्णत: अपयशी ठरला

आहे. त्याला आतापर्यंत जेमतेम दोन बळी मिळवता आले आहेत. दुखापतग्रस्त नॅथन कोल्टर-नाइलच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन संघात परतल्यामुळे बेंगळूरुच्या गोलंदाजीची ताकद वाढेल, अशी अपेक्षा आहे.

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवणारा कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकच्या कामगिरीकडे या सामन्यात लक्ष असेल. युवा यष्टीरक्षक ऋषभ पंतला मागे टाकत कार्तिकने आश्चर्यकारकरीत्या संघात स्थान मिळवले होते. यंदाच्या हंगामात कार्तिकने एकमेव अर्धशतक झळकावले आहे, तर १८.५० धावांची सरासरी राखली आहे.

संघ

* रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु : विराट कोहली (कर्णधार), एबी डी’व्हिलियर्स, पार्थिव पटेल (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉइनिस, शिम्रॉन हेटमायर, शिवम दुबे, डेल स्टेन, वॉशिंग्टन सुंदर, उमेश यादव, यजुर्वेद्र चहल, मोहम्मद सिराज, हेन्रिच क्लासीन (यष्टीरक्षक), मोईन अली, कॉलिन डी ग्रँडहोमी, पवन नेगी, टिम साऊदी, आकाशदीप नाथ, मिलिंद कुमार, देवदूत पडिक्कल, गुरकिराट सिंग, प्रयास राय बर्मन, कुलवंत केजरोलिया, नवदीप सैनी, हिम्मत सिंग.

* कोलकाता नाइट रायडर्स : दिनेश कार्तिक (कर्णधार व यष्टीरक्षक), रॉबिन उथप्पा, ख्रिस लीन, शुभमन गिल, आंद्रे रसेल, कार्लोस ब्रेथवेट, सुनील नरेन, पीयूष चावला, कुलदीप यादव, निखिल नाईक, जोए डेन्ली, श्रीकांत मुंढे, नितीश राणा, संदीप वारियर, प्रसिध कृष्णा, लॉकी फग्र्युसन, हॅरी गुरने, के. सी. करिअप्पा, यारा पृथ्वीराज, मॅट केली.

* सामन्याची वेळ : रात्री ८ वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १