IPLच्या २०१९मध्ये होणाऱ्या हंगामासाठी भारताचा सलामीवीर शिखर धवन हा दिल्ली डेअरडेव्हील्स संघाकडून खेळणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. शिखर हा आधी हैदराबाद संघाकडून खेळत होता. पण हैदराबादच्या संघाने शहाबाज नदीम, अभिषेक शर्मा आणि विजय शंकर या तीन खेळाडूंच्या बदल्यात शिखर धवनला दिल्लीच्या संघाकडे हस्तांतरित केले, अशी माहिती मिळत आहे. मात्र या संदर्भात दिल्ली डेअरडेव्हिल्स, सनरायझर्स हैदराबाद किंवा आयपीएल कोणीही अधिकृत ट्विट केलेले नाही.

गेल्या काही दिवसांपासून शिखर धवन हा पुन्हा दिल्लीच्या संघाकडून आयपीएलचे सामने खेळणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. २००८ साली शिखर धवनने दिल्लीच्या संघाकडून पहिल्यांदा IPLमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याचा प्रवास मुंबईइंडियन्स, डेक्कन चार्जर्स आणि सनरायझर्स हैदराबाद असा झाला. धवनने आतापर्यंत १४३ आयपीएल सामने खेळले असून त्यात ३३.२६ च्या सरासरीने आणि १२३.५३ च्या स्ट्राईक रेटने एकूण ४०५८ धावा केल्या आहेत.