News Flash

CSK vs KKR : वानखेडेवर चेन्नईच्या विजयाची हॅट्ट्रिक!

गुणतालिकेत चेन्नई पहिल्या स्थानी

चेन्नई सुपर किंग्ज

मुंबईच्या वानखेडेवर रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सवर 18 धावांनी विजय मिळवत आपला विजयी प्रवास सुरू ठेवला आहे. कोलकाताचा कर्णधार ईऑन मॉर्गनने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्वीकारली. मात्र, त्याचा हा निर्णय फसला. चेन्नईने कोलकातासमोर 20 षटकात 3 बाद 220 धावा उभारल्या. चेन्नईचे सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसिस यांनी आक्रमक फलंदाजी करत कोलकाताच्या गोलंदाजांना नामोहरम केले.  प्रत्युत्तरात कोलकाताने पहिल्या पॉवरप्लेमध्ये आपले अर्धे फलंदाज गमावले, त्यानंतर आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक आणि पॅट कमिन्सने वादळी खेळी करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची झुंज अपयशी ठरली. कोलकाताचा डाव 202 धावांवर संपुष्टात आला. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले आहे. चेन्नईचा सलामीवीर फाफ डु प्लेसिसला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

 

कोलकाताचा डाव

चेन्नईच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात खराब झाली. दीपक चहरने चेन्नईसाठी टाकलेल्या पहिल्याच षटकात शुबमन गिल लुंगी एनगिडीकडे झेल देऊन बसला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर पुढच्या षटकात दीपकने नितीश राणाला (9) झेलबाद केले. धोनीने राणाचा झेल घेतला. कोलकाताचा कर्णधार ईऑन मॉर्गनही अपयशी ठरला. चहरने त्याला यष्टीपाठी झेलबाद केले. याच षटकात चहरने सुनील नरिनचाही काटा काढत कोलकाताला अजून संकटात टाकले. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात लुंगी एनगिडीने राहुल त्रिपाठीला बाद केले. त्रिपाठीला 8 धावा करता आल्या.

पाच फलंदाज बाद झाल्यानंतर आंद्रे रसेल आणि दिनेश कार्तिक यांनी चेन्नईच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. 10व्या षटकात या दोघांनी 25 चेंडूत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. 10 षटकात कोलकाताने 5 बाद 97 धावांपर्यंत मजल मारली. रसेलने चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई करत 21 चेंडूत अर्धशतक ठोकले. अर्धशतकानंतर रसेल सॅम करनच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. त्याने 22 चेंडूत 3 चौकार आणि 6 षटकारांसह 54 धावांची खेळी केली. रसेलनंतर कार्तिकही वैयक्तिक 40 धावांवर बाद झाला. एनगिडीने त्याला 15व्या षटकात पायचित पकडले. कार्तिकनंतर पॅट कमिन्सने आक्रमणाला सुरुवात केली. त्याने सॅम करनच्या 15व्या षटकात 24 धावा कुटत अपेक्षित धावांचे अंतर कमी केले. 18व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कमिन्सने दोन धावा घेत 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. शेवटच्या षटकात कोलकाताला 20 धावांची गरज असताना प्रसिध कृष्णा पहिल्या चेंडूवर धावबाद झाला आणि कोलकाताचा डाव 202 धावांवर संपुष्टात आला.  कमिन्सने 34 चेंडूत 4 चौकार आणि 6 षटकारांसह 66 धावांची नाबाद खेळी केली.

चेन्नईचा डाव 

मराठमोळा फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसिस यांनी चेन्नईच्या डावाची दमदार सुरुवात केली. पहिल्या 5 षटकात या दोघांनी चेन्नईच्या 44 धावा फलकावर लावल्या. मागील काही सामन्यांपासून फ्लॉप ठरलेल्या ऋतुराज गायकवाडने 11व्या षटकात आयपीएलमधील आपले पाचवे अर्धशतक पूर्ण केले. आक्रमक झालेला ऋतुराज अर्धशतकानंतर बाद झाला. फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने त्याला 13व्या षटकात झेलबाद केले. ऋतुराजने 6 चौकार आणि 4 षटकारांसह 64 धावांची खेळी केली. ऋतुराज आणि डु प्लेसिसने पहिल्या गड्यासाठी 115 धावांची भागीदारी रचली. ऋतुराज बाद झाल्यानंतर प्लेसिसने अर्धशतक पूर्ण केले. 16व्या षटकात चेन्नईने दीडशे धावांचा पल्ला ओलांडला.

ऋतुराजनंतर मैदानात आलेल्या मोईन अलीने आक्रमक फलंदाजी केली. त्याने डु प्लेसिससोबत 26 चेंडूत अर्धशतकी भागीदारी रचली. कोलकाताचा फिरकीपटू सुनील नरिनला मोठा फटका खेळण्याच्या नादात तो यष्टिचीत झाला. अलीने 12 चेंडूत 25 धावा ठोकल्या. अलीनंतर धोनी मैदानात आला. 8 चेंडूत 17 धावा करून तो 19व्या षटकात बाद झाला. रसेलच्या गोलंदाजीवर मॉर्गनने त्याचा अप्रतिम झेल टिपला. शेवटच्या षटकात डु प्लेसिसने पॅट कमिन्सला 2 षटकार ठोकले. मात्र, त्याला शतक पूर्ण करता आले नाही. डु प्लेसिसने 60 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 95 धावांची खेळी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2021 11:32 pm

Web Title: ipl 2021 csk beat kkr by 18 runs in mumbai adn 96
टॅग : IPL 2021
Next Stories
1 IPL 2021 : चेन्नईच्या मराठमोळ्या फलंदाजाचे अर्धशतक, पण चर्चा होतेय धोनीची
2 SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादने चाखली विजयाची चव!
3 CSK vs KKR : रंगतदार सामन्यात चेन्नईची कोलकातावर सरशी, रसेल-कमिन्सची झुंज अपयशी
Just Now!
X