१७ राष्ट्रीय संघांचा समावेश; एआयएफएफ सचिव कुशल दास यांची माहिती
आय-लीग आणि इंडियन सुपर लीग यांच्या विलीनीकरणाची शक्यता बळावली आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) याबाबत गांभीर्याने विचार करत आहे. तसे झाल्यास देशातील १७ संघ या लीगमध्ये खेळतील, अशी माहिती एआयएफएफचे सचिव कुशल दास यांनी दिली.
‘‘आय-लीगमधील संघ संख्या कमी होत आहे ही सत्य बाब असली, तरी दोन नवीन संघांचा समावेश करण्यात आला आहे. पुणे एफसी खेळणार नाही, हा आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे. गेल्या काही वर्षांत त्यांना चाहतावर्ग निर्माण करण्यात अपयश आल्याचे कारण यामागे असू शकते,’’ असे दास यांनी सांगितले. ‘‘ दोन वर्षांपूर्वी आय लीगमध्ये १२ संघांचा समावेश होता आणि आता आय-लीग व आयएसएल यांचे विलीनीकरण केल्यास १७ संघ खेळू शकतील. त्यामुळे या दोन्ही लीगच्या विलीनीकरणाचा विचार करण्यास आम्हाला मदत मिळेल,’’ असेही दास म्हणाले.
गतवर्षी आय-लीगमध्ये ११ संघ खेळले होते. त्यापैकी पुणे एफसी, भारत एफसी आणि रॉयल वहींगडोह यांनी यंदा माघार घेतली आहे आणि डेम्पोची हकालपट्टी करण्यात आली आहे. डीएसके-शिवाजीयन्स आणि ऐझॉल एफसी यांनी आय-लीगच्या यंदाच्या हंगामात खेळण्याचा निर्णय घेतल्याने संघ संख्या ९ झाली आहे. यंदाच्या हंगामाचा पहिला सामना कोलकाता येथे ९ जानेवारीला गतविजेत्या मोहन बगान आणि ऐझॉल एफसी यांच्यात होणार आहे.
१७ वर्षांखालील विश्वचषक निर्णायक
भारतात २०१७ मध्ये होणारा १७ वर्षांखालील विश्वचषक भारतीय फुटबॉलसाठी निर्णायक असेल असे मत अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे महासचिव कुशल दास यांनी सांगितले. यजमान या नात्याने भारताला स्पर्धेत थेट प्रवेश आहे. मात्र १७ वर्षांखालील भारतीय संघ आशियाई स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. स्पेनमधील स्पर्धेतही त्यांनी चांगली कामगिरी केली. निकोलाई अ‍ॅडम्स यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ प्रगती करत आहे. विश्वचषकाच्या निमित्ताने भारतीय गुणवत्ता जगासमोर येईल. यजमान नात्याने संयोजन कौशल्यही सिद्ध होईल.