अध्यक्ष संदीप पाटील यांची खंत; संघाचे हित लक्षात घेऊन निर्णय

निवड समितीवर काम करताना खूप समाधान वाटत असले तरी काही वेळा आपले मित्र दुरावले जातात, अशी खंत भारतीय क्रिकेट निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी व्यक्त केली.

पाटील यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या निवड समितीची लवकरच मुदत संपत आहे. या समितीच्या जागी नवीन समिती नियुक्त केली जाणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड येथे करण्यात आली. पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेली ही अखेरची निवड आहे.

पाटील म्हणाले, आमच्या समितीने भारतीय संघाचे हित लक्षात घेऊन काही धाडसी व कठोर निर्णय घेतले होते. आमच्या निर्णयप्रक्रियेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कधीही ढवळाढवळ केली नाही. मंडळाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याने आमच्यावर एखाद्या खेळाडूला संघात स्थान देण्यासाठी दबाव आणलेला नाही. भारतीय संघाची क्रिकेटच्या तीनही स्वरूपांच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी होत आहे.

पाटील यांनी सांगितले, माझ्या कारकीर्दीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले व त्याचा फायदा सर्वसाधारण क्रिकेटच्या विकासाकरिता झाला आहे, असे मी अभिमानाने सांगेन. भारताच्या कनिष्ठ संघाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविड व वरिष्ठ संघाच्या प्रशिक्षकपदी अनिल कुंबळे यांची नियुक्ती करण्याचा निर्णयच हितकारक होता.

नवीन निवड समितीपुढेही भरपूर आव्हाने आहेत. आपल्या देशात क्रिकेटच्या प्रत्येक स्वरूपात चपखल बसतील असे विपुल नैपुण्य उपलब्ध आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी मालिकेत भारतीय संघ अव्वल दर्जाची कामगिरी करील अशी मला खात्री आहे. घरच्या मैदानावर व वातावरणात खेळण्याचा फायदा भारतीय संघाला मिळणार आहे.