क्रिकेट हा जरी आपल्या देशाचा खेळ झाला असला तरी अन्य खेळांमध्ये विपुल नैपुण्य आहे व अशा खेळांचा आदर ठेवला पाहिजे, असे ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिलदेव यांनी येथे सांगितले. प्रो कबड्डी स्पर्धेतील पुणेरी पलटण संघाच्या खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी ते आले होते.
पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, मी देखील शाळेत असताना कबड्डी खेळत असे. त्यामुळे मला कबड्डी हा खेळ नवीन नाही. मात्र आता या खेळाने खूप प्रगती केली आहे. या खेळात आपण जागतिक स्तरावर वर्चस्व राखले आहे. या खेळासाठी आपल्या देशात खूप लोकप्रियता लाभली आहे. खेडोपाडी या खेळावर प्रेक्षक व खेळाडूंचे क्रिकेटमध्ये आलो नसतो तर कदाचित कबड्डीत कारकीर्द घडवली असती. अर्थात आमच्या वेळी अशी संधी नव्हती.
कबड्डी लीगसाठी समालोचन करणार काय असे विचारले असता कपिलदेव म्हणाले, सध्या तरी त्याचा विचार नाही मात्र आणखी चारपाच वर्षांमध्ये मी या खेळाचे बारकावे आत्मसात केले तर निश्चितच या खेळासाठी समालोचन करण्यास मला आवडेल. कबड्डी लीगमुळे या खेळाची प्रतिमा खूप उंचावली आहे, खेळाडूंना चांगले पैसे मिळू लागले आहेत, पण त्यापेक्षाही त्यांना येथे मिळणारा अनुभव जास्त महत्त्वपूर्ण आहे. त्याचा फायदा त्यांना भविष्यातील कारकीर्दीसाठी होऊ शकेल.
सध्या वेळ कसा व्यतीत करता असे विचारले असता ते म्हणाले, शनिवार व रविवारी मी गोल्फ मैदानावर खेळाचा आनंद घेतो. अन्य दिवशी मित्रांसमवेत बॅडमिंटनही खेळतो. तसेच अकादमीत क्रिकेटचे प्रशिक्षणही देत असतो. सतत मैदानावर राहून आपली तंदुरुस्ती टिकविण्यास प्राधान्य देतो.
पुण्याच्या खेळाडूंना कपिलदेवकडून कानमंत्र           
पुणेरी पलटण संघाच्या खेळाडूंना मार्गदर्शन करताना कपिलदेव यांनी सांगितले, मैदानाबाहेर सर्व खेळाडूंचा आदर ठेवला पाहिजे. मात्र मैदानावर खेळायला उतरता तेव्हा आपण श्रेष्ठ आहोत असे मानून सर्वोत्तम कौशल्य दाखविले पाहिजे. हारजीत हा खेळाचा अविभाज्य भाग असतो. सामना गमावला तरी निराश न होता पुढच्या सामन्यासाठी तयारी केली पाहिजे. कोणत्याही संघाकडून खेळताना संघावरील निष्ठा ठेवणे महत्त्वाचे असते. शारीरिक तंदुरुस्ती असेल तर मानसिक तंदुरुस्ती टिकून राहते. त्यामुळे नियमित व्यायाम केला पाहिजे. दुखापतींवर लगेचच उपचार करीत पुन्हा खेळात कसे येता येईल यास प्राधान्य दिले पाहिजे.
कबड्डी या खेळांत सांघिक कौशल्य अधिक महत्त्वाचे असते. त्यामुळे आपल्या सहकाऱ्यांबरोबर सुसंवाद ठेवला पाहिजे.