आज चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध अखेरचा साखळी सामना

बाद फेरीमध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक संघ उत्सुक असतो. किंग्ज इलेव्हन पंजाबही त्यास अपवाद नाही. पंजाबला हे ध्येय साध्य करण्यासाठी यापूर्वीच बाद फेरी गाठणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध मोठा विजय मिळवणे अनिवार्य आहे. या दोन संघांमध्ये येथे रविवारी महत्त्वपूर्ण लढत होत असून धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलकडून पंजाबला झंझावाती खेळाची गरज आहे.

गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना होत आहे. या मोसमातील या स्टेडियमवरील अखेरचा आयपीएल सामना असल्यामुळे सुट्टीच्या दिवशी चाहत्यांना चौकार व षटकारांचा आनंद मिळण्याचीच अपेक्षा आहे. चेन्नई संघाने १६ गुणांसह साखळी गटात दुसरे स्थान घेतले आहे. असे असले तरी चेन्नई संघाला शुक्रवारी साखळी गटात शेवटच्या स्थानावर असलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून ३४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. हा पराभव चेन्नईसाठी निश्चितच आत्मपरीक्षणाचा आहे. विशेषत: बाद फेरीपूर्वी त्यांना या पराभवातून पुन्हा विजयपथावर येण्यासाठी सर्वोच्च कामगिरी करावी लागणार आहे.

अंबाती रायुडू, शेन वॉटसन व कर्णधार महेंद्रसिंग धोनी या तीन फलंदाजांनी यंदाच्या आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यांच्याबरोबरच सुरेश रैना, ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जडेजा यांच्याकडूनही त्यांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. द्रुतगती गोलंदाज दीपक चहार हा दुखापतीमधून तंदुरुस्त झाल्यामुळे चेन्नईच्या गोलंदाजीची बाजू बळकट झाली आहे. त्याच्याबरोबरच शार्दूल ठाकूर, वॉटसन, जडेजा, हरभजन सिंग हे त्यांचे गोलंदाज गेल व के. एल. राहुल यांच्या फटकेबाजीला कसे रोखतात हीच उत्सुकता आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये सुरुवातीला गेलने जो धडाकेबाज खेळ केला होता, तसा खेळ त्याला पुन्हा करता आलेला नाही. गेल व राहुल यांच्याबरोबरच आरोन फिन्च, मयांक अगरवाल, अक्षर पटेल, मनोज तिवारी, करुण नायर, डेव्हिड मिलर यांच्यावरही पंजाबच्या फलंदाजीची भिस्त आहे. गोलंदाजीत अँड्रय़ू टाय, मुजीब उर रहेमान, कर्णधार रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल यांच्याकडून पंजाबला प्रभावी कामगिरीची अपेक्षा आहे.

  • सामन्याची वेळ : रात्री ८ वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स