दुसऱ्या कसोटीतील मानहानीकारक पराभवानंतर पत्रकार परिषदेदरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या खोचक प्रश्नाला उत्तर देताना भारताचा कर्णधार विराट कोहली चांगलाच संतापलेला दिसला. कोहली कर्णधार झाल्यानंतरचा हा भारताचा पहिलाच मालिका पराभव आहे.

सेंच्युरियन मैदानात १३५ धावांनी पराभव झाल्यानंतर विराट कोहलीने पत्रकारांशी संवाद साधला. मात्र मैदानातील परभव विराटच्या जिव्हारी लागल्याने त्याने आपला राग पत्रकारांवर व्यक्त केल्याचे चित्र या पत्रकार परिषदेमध्ये दिसले. ‘भारताने सेंच्युरियनवर सर्वोत्तम अंतिम संघ उतरवला होता का?’, या प्रश्नावर कोहलीने चिडून म्हटले की, ‘सर्वोत्तम अंतिम संघ म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे आहे? आम्ही जिंकलो असतो तर असा प्रश्न विचारला गेला नसता. सामन्याच्या निकालानुसार आम्ही अंतिम संघनिवड करत नाही. त्यामुळे तुम्ही सर्वोत्तम संघ निवडा. तो संघ आम्ही खेळवू.’ त्यानंतरही भारतीय संघ केवळ मायदेशी याआधीच्या मालिका जिंकल्यावरूनही कोहली आणि पत्रकारात बाचाबाची होण्याची शक्यता लक्षात घेऊन मिडीया मॅनेजरने मध्यस्थी करत पुढील संवाद टाळल्याचे कळते.

पहिल्या दोन कसोटीसाठी निवडलेल्या अंतिम संघाचे समर्थन करताना कोहली म्हणाला, ‘‘सलग दुसऱ्या पराभवाने आम्ही निराश झालो आहोत. मात्र तुम्हाला एक निर्णय घ्यावा लागतो. त्यात पुन्हा बदल करता येत नाही. सांघिक हित लक्षात घेत आम्ही संघनिवड केली. मात्र पराभवानंतर आम्ही खेळण्यास लायक नाही, हे म्हणणे चुकीचे आहे.’’ अनुभवी अजिंक्य रहाणेला दोन्ही कसोटीमध्ये वगळल्याने संघ व्यवस्थापनावर टीका होत आहे.

विराटच्या या उद्धट वर्तवणुकीवर नेटकऱ्यांनी टिकेची झोड उठवली आहे. अनेकांनी धोनी हा कर्णधार म्हणून का श्रेष्ठ होता हे विराटच्या वागण्यावरून दिसून आल्याचे म्हटले आहे तर काहींनी हाच राग विराटने मैदानात दाखवल्यास संघाला त्याचा फायदा होईल असा सल्ला दिला आहे.