धावांचा महापूर ठरलेल्या ‘अ’ संघाच्या तिरंगी एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या साखळी लढतीत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका संघावर ३४ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने अंतिम फेरीत स्थान पटकावले असून, अंतिम लढतीत त्यांच्यासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान असणार आहे.
फलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. उन्मुक्त चंद आणि मयांक अगरवाल यांनी १०६ धावांची खणखणीत सलामी दिली. उन्मुक्त ६४ धावा करून बाद झाला. यानंतर मयांकला मनीषची साथ मिळाली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी २०३ धावांची मॅरेथॉन भागीदारी करताना चौकार-षटकारांची लयलूट केली. द्विशतकाकडे वाटचाल करणाऱ्या मयांकला लोनवाबो त्सोसोबेने बाद केले. मयांकने १३३ चेंडूंत २० चौकार आणि ५ षटकारांसह १७६ धावांची वेगवान खेळी साकारली. भारतीय अ संघातर्फे खेळतानाची ही दुसरी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. पांडेने ८५ चेंडूंत ८ चौकार आणि २ षटकारांसह १०८ धावा केल्या. या दोघांच्या प्रचंड भागीदारीच्या बळावर भारतीय संघाने ३७१ धावांचा डोंगर उभारला.
दक्षिण आफ्रिकेने सहजासहजी हार न मानता ३३७ धावा करीत जोरदार संघर्ष केला. दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय संघातून डच्चू मिळालेल्या क्विंटन डी कॉकने १० चौकार आणि ६ षटकारांसह ८६ चेंडूंत ११३ धावांची खेळी साकारली. खाया झोंडोने ८६ तर रीझा हेन्ड्रिक्सने ७६ धावा करीत लक्ष्य गाठण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले, मात्र ते अपुरे ठरले. भारतातर्फे अक्षर पटेलने ३ बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
भारत ‘अ’ : ५० षटकांत ३ बाद ३७१ (मयांक अग्रवाल १७६, मनीष पांडे १०८) विजयी विरुद्ध दक्षिण आफ्रिका ‘अ’ : ५० षटकांत ६ बाद ३३७ (क्विंटन डी कॉक ११३, खाया झोंडो ८६, अक्षर पटेल ३/३२)
सामनावीर : मयांक अग्रवाल