भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने देशातला सर्वात प्रभावशाली खेळाडू बनण्याचा मान पटकावला आहे. धोनीने माजी खेळा़डू सचिन तेंडुलकर आणि सध्याचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकलं आहे. YouGuv Influncer Index 2018 ने केलेल्या सर्वेक्षणानुसार धोनी या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. अभिनेते अमिताभ बच्चन आणि दिपीका पदुकोण यांनी या यादीमध्ये अनुक्रमे पहिलं व दुसरं स्थान पटकावलं आहे. विविध क्षेत्रातील 60 व्यक्तींची नाव संकेतस्थळावर देऊन लोकांचे अभिप्राय मागवण्यात आले होते, त्यानुसार लोकांनी आपलं मत नोंदवलं आहे.

धोनी व्यतिरीक्त सचिन तेंडुलकरने या यादीमध्ये चौथं स्थान पटकावलं आहे. कर्णधार विराट कोहलीने या यादीमध्ये सहावं स्थान पटकावलं आहे. याचसोबत अक्षय कुमार, शाहरुख खान, आमिर खान, आलिया भट, प्रियंका चोप्रा या सेलिब्रेटींनीही या यादीत सर्वोत्तम 10 जणांमध्ये स्थान पटकावलं आहे.

अवश्य वाचा – धोनी-साक्षीला एकत्र आणण्यात टीम इंडियाच्या या खेळाडूचा मोठा वाटा

गेली अनेक वर्ष महेंद्रसिंह धोनी हा भारतीय क्रिकेटचा चेहरा बनला आहे. भारताकडून खेळताना कर्णधार या नात्याने धोनीने टी-20 विश्वचषक, वन-डे विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या तिन्ही महत्वाच्या स्पर्धांची विजेतेपद मिळवली आहेत. याचसोबत आयपीएमध्ये धोनी चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळतो, चेन्नईच्या संघाला आयपीएलमध्ये चाहत्यांचा नेहमी पाठींबा असतो. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार केला असता धोनीने प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये सचिन-विराटला मागे टाकलं आहे.

अवश्य वाचा – क्रिकेट अकादमीच्या उद्घाटनप्रसंगी महेंद्रसिंग धोनी यांची शाब्दिक फटकेबाजी