IPL 2020ची अधिकृत घोषणा रविवारी करण्यात आली. IPL गव्हर्निंग काऊन्सिलने रविवारी झालेल्या बैठकीत युएईमध्ये खेळवल्या जाणाऱ्या तेराव्या हंगामाची अधिकृत घोषणा केल्यानंतर या स्पर्धेला केंद्र सरकारनेही परवानगी दिली. १९ सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघांना २० ऑगस्टनंतर युएईला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे जवळपास चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर IPLच्या तयारीचा विचार करता भारताचा महेंद्रसिंग धोनी सरावासाठी मैदानात आल्याचे दिसलं.
झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये धोनीने बंद दाराआड सराव केल्याची माहिती झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्याने न्यू इंडियन एक्सप्रेसला दिली. “धोनी गेल्या आठवड्यात JSCA आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये आला होता. त्यावेळी त्याने इन-डोअर सुविधांचा वापर करत सराव केला. त्याने बॉलिंग मशीनचा वापर करत फलंदाजी केली. त्याने गेल्या आठवड्यात वीकएंड्सला (शनिवारी-रविवारी) दोन दिवस बॅटिंग कसून सराव केला. पण त्यानंतर मात्र तो परत फिरकला नाही. धोनीचा नक्की काय प्लॅन आहे आणि तो परत सरावासाठी येथे येईल का? याची मला खरंच कल्पना नाही. तो गेल्या आठवड्यात सरावासाठी इथे आला होता इतकंच आम्हाला माहिती आहे”, असं त्या पदाधिकाऱ्याने सांगितलं.
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी त्याच्या आधीच या स्पर्धेसाठी तयार झाली असल्याचं दिसलं. साक्षीने सोमवारी एक खास फोटो पोस्ट केला होता. या फोटोत तिने चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या जर्सीशी मिळताजुळता पिवळ्या रंगाचा टॉप परिधान करत फोटो शेअर केला. या फोटोला कोणतंही कॅप्शन न देता तिने फोटो सरळ पोस्ट केला. त्यानंतर चेन्नई संघांच्या चाहत्यांनी या फोटोवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला होता.