एम. एस. के. प्रसाद आणि गगन खोडा यांच्या जागेवर, क्रिकेट सल्लागार समितीने काही दिवसांपूर्वी दोन नवीन सदस्यांची निवड केली. भारताचा माजी फिरकीपटू सुनिल जोशीला निवड समितीच्या अध्यक्षपदाची लॉटरी लागलेली असून…हरविंदर सिंह यांचीही निवड समितीवर नियुक्ती करण्यात आलेली आहे. गेले अनेक महिने धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दुरावलेला आहे. आगामी आयपीएलसाठी धोनीने तयारी सुरु केली आहे. आगामी टी-२० विश्वचषकासाठी धोनीचा भारतीय संघात विचार केला जावा अशी काही चाहत्यांची मागणी आहे. मात्र बीसीसीआयने धोनीबद्दलच्या भूमिकेत तसूभरही बदल केलेला नाहीये.

आगामी आयपीएल हंगामात धोनीने चांगली कामगिरी केली तरच त्याचा भारतीय संघात विचार केला जाईल असं बीसीसीआयमधील अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थाला सांगितलं. सुनिल जोशी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने रविवारी अहमदाबादमध्ये आफ्रिकेविरुद्ध वन-डे मालिकेसाठी भारतीय संघाची निवड केली. मात्र या बैठकीत धोनीबद्दल चर्चाही झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

“आयपीएलमध्ये कामगिरी चांगली झाली तरच धोनी भारतीय संघात पुनरागमन करेल. धोनीच नाही, अनेक अनुभवी आणि तरुण खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार आहेत…प्रत्येकाच्या खेळावर आमची नजर आहे, आणि चांगली कामगिरी करणाऱ्या प्रत्येकाचा विचार केला जाईल. त्यामुळे काही सरप्राईज पॅकेजही आपल्याला बघायला मिळू शकेल. मात्र भारतीय संघात निवडीसाठी आयपीएलच्या कामगिरीचा विचार केला जाईल”, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं. भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही धोनीच्या आयपीएलमधील कामगिरीवर त्याचं पुनरागमन अवलंबून असेल असं वक्तव्य केलं होतं. दरम्यान २९ मार्चपासून आयपीएलच्या आगामी हंगामाला सुरुवात होणार असून पहिला सामना गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात रंगणार आहे.