पाकिस्तान संघातील गोलंदाज वयचोरी करतात. ते फक्त कागदावर तरुण आहेत. मात्र वास्तविकपणे त्यांचे वय जास्त आहे, असा आरोप माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आसिफने केला आहे. पाकिस्तानच्या गोलंदाजाचं कागदावर वय १७-१८ असते. मात्र त्यांचं खरं वय २७-१८ वर्ष असते, असा खळबळजनक आरोप मोहम्मद आसिफनं केला आहे. पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक कमरान अकमल याच्या यु ट्यूब चॅनलवर चर्चा करताना ३८ वर्षीय आसिफनं पाकिस्तानी गोलंदाजांची पोलखोल केली.
आसिफ म्हणाला, अलीकडच्या काळात पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजीची धार दिसत नाही. ५-६ वर्षात एकाही गोलंदाजाला कसोटी सामन्यात १० बळी घेता आले नाहीत. पाच-सहा षटके टाकल्यानंतर या नव्या दमाच्या गोलंदाजांना क्षेत्ररक्षणासाठीही उभे राहता येत नाही, इतकी त्यांची दमछाक होते. आधीच्या गोलंदाजाप्रमाणे कसोटीत २० विकेट घेण्याची क्षमता पाकिस्तानी गोंलादाजीमध्ये दिसत नाही, अशी खंतही आसिफने व्यक्त केली.
आसिफ म्हणाला, ‘सध्याच्या पाकिस्तानी गोलंदाजाकडे पुरेसा अनुभव नाही. त्यांना माहित नाही की, फलंदाजांना पुढच्या पायावर चेंडू कसा फेकायचा. योग्य टप्प्यावर गोलंदाजी करताना काय करावं? त्याचबरोबर धावा न देता यष्टीवर कशी गोलंदाजी करावी. जेव्हा ते यष्टीवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते डाव्या बाजूला जातात. सध्याच्या गोलंदाजाकडे नियंत्रणच नाही.’
न्यूझीलंडमधील उसळत्या खेळपट्टीला पाहून आम्हाला आनंद व्हायचा. एक वेगवान गोलंदाज म्हणून आशा खेळपट्यावर गोलंदाजी करताना आनंद व्हायचा. अशा खेळपट्टायवर पाच विकेट घेतल्यानंतरच मैदान सोडायचा विचार करायचो, असेही आसिफ म्हणाला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 3, 2021 8:32 am