भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन याला लय सापडल्याचे दिसते. दाम्बुलामध्ये श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने झंजावती शतक ठोकले. श्रीलंका दौऱ्यातील धवनचे हे तिसरे शतक आहे. कसोटी सामन्यात त्याने दोन शतके झळकावली होती. आपल्या कामगिरीत सातत्य राखत श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने दमदार शतकी खेळी केली. या खेळीनंतर धवनने आपल्या भावना व्यक्त केल्या. धवन म्हणाला की, अपयशातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. कारकिर्दीत चढ-उताराच्या परिस्थितीने मला खूप काही शिकवले. मी यापूर्वी कठीण परिस्थितीतून गेलो आहे. मैदानातील अपयशाने मी निराश होत नाही, तसेच याबद्दल अधिक विचार करत नाही. खेळात चांगल्या कामगिरीसाठी माझा सराव सुरुच ठेवतो.

तो पुढे म्हणाला की, ज्यावेळी मी खराब फॉर्ममध्ये असतो तेव्हा मी खेळावर लक्ष केंद्रित करण्यावर भर देतो. चांगली खेळी करत असताना देखील मी हा मंत्र जपतो. ही गोष्ट चढ-उताराच्या काळात माझ्यासाठी फायदेशीर ठरते. सामनावीराचा पुरस्कार स्वीकारल्यानंतर धवनने दिलेली प्रतिक्रिया त्याच्या यशाचं गुपित सांगणारी अशीच आहे. गेल्या तीन महिन्यांपासून शिखर धवन सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत त्याने लक्षवेधी कामगिरी केली. कसोटीमध्ये दमदार खेळीनंतर रविवारी श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात धवन चांगलाच बरसला. या सामन्यात त्याने ९० चेंडूत २० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १३२ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या दमदार खेळीच्या जोरावर या सामन्यात भारताने श्रीलंकेला ९ गडी राखून सहज पराभूत केले. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे.

सध्याच्या घडीला भारतीय संघात सलामीवीर म्हणून अनेक पर्याय उपलब्ध आहेत. निवड समितीकडे पर्याय उपलब्ध असतील तर संधी मिळालेल्या सलामीवीरावर चांगली कामगिरी करण्याचा दबाव नक्कीच असतो. धवन हा दबाव चांगल्या पद्धतीने पेलताना दिसतो.