ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून भारताला गवसलेला सर्वाधिक मौल्यवान खेळाडू म्हणजे मोहम्मद सिराज असून असंख्य आव्हानांना सामोरे जाताना त्याने दाखवलेली परिपक्वता वाखाणण्याजोगी आहे, अशा शब्दांत मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारताच्या वेगवान गोलंदाजाचे कौतुक केले.

पितृशोकानंतरही देशहिताला प्राधान्य देणाऱ्या २६ वर्षीय सिराजने मालिकेत भारतासाठी सर्वाधिक १३ बळी मिळवून संघाला बॉर्डर-गावस्कर करंडक पुन्हा जिंकवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. भारताने ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. त्यामुळे शास्त्री यांनी सिराजवर स्तुतिसुमने उधळताना खास ‘ट्वीट’ केले.

‘‘सिराज ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील भारताला गवसलेला सर्वाधिक मौल्यवान खेळाडू आहे. वैयक्तिक आयुष्यात अनेक समस्या सुरू असतानाच त्याला या दौऱ्यात वर्णद्वेषी टिप्पणीलासुद्धा सामोरे जावे लागले. त्यातच चौथ्या कसोटीत भारताच्या गोलंदाजीचे नेतृत्व करण्याची वेळ सिराजवर आली. परंतु सिराजने प्रत्येक आव्हान पेलत भारतासाठी सर्वोत्तम योगदान दिले. यादरम्यान खेळाडू म्हणून त्याची विकसित होणारी प्रगल्भता पाहून मला आनंद झाला,’’ असे शास्त्री म्हणाले. सिराज या मालिकेत भारताकडून एका डावात पाच बळी मिळवणारा एकमेव गोलंदाज ठरला.

शास्त्रींसह सर्व भारतीय खेळाडूंचे गेल्या दोन दिवसांच्या अंतरात मायदेशी आगमन झाले. काही दिवस कुटुंबियांसह वेळ घालवल्यानंतर ५ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वपूर्ण कसोटी मालिकेसाठी भारतीय खेळाडूंना पुन्हा एकत्र यावे लागणार आहे. सिराजची या मालिकेसाठी संघात निवड झाली आहे.