विश्वचषक २०१९ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील मूळ सामना अनिर्णित राहिला त्यावेळी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. पण सुपर ओव्हरमध्येही दोनही संघांची धावसंख्या समानच राहिली आणि अखेर मूळ सामन्यातील चौकार-षटकारांच्या संख्येवर इंग्लंडला विश्वविजेता ठरवण्यात आले. त्यानंतर ICC च्या या नियमाबाबत त्यांच्यावर खूप टीका करण्यात आली. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग स्पर्धेत एक सुपर ओव्हर अनिर्णित राहिल्यास पुन्हा सुपर ओव्हर खेळवण्यात येणार असल्याचा नवा नियम बनवण्यात आला आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी या नव्या नियमाबाबत माहिती दिली. जर दोन संघांमधील सामना अनिर्णित राहिला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. पण ती सुपर ओव्हर जर अनिर्णित राहिली, तर एक संघ स्पष्ट विजेतेपद मिळवेपर्यंत सुपर ओव्हरचा खेळ सुरूच ठेवण्यात येईल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले. पुरूष आणि महिला अशा दोनही बिग बॅश लीग स्पर्धांमध्ये हा नियम लागू करण्यात येणार आहे. मात्र साखळी सामन्यात सुपर ओव्हर अनिर्णित राहिल्यास दोन संघांना गुण विभागून दिले जातील, असेही सांगण्यात आले आहे.
विश्वचषक स्पर्धा २०१९ च्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हरच्या माध्यमातून इंग्लंड नवा विश्वविजेता ठरला होता. न्यूझीलंडने ५० षटकात २४१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनेदेखील २४१ धावाच केल्या. त्यामुळे सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सर्वाधिक चौकार-षटकारांच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता ठरवण्यात आले. पण या नियमामुळे ICC वर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती.