जॉनी बेअरस्टोचा सावध पवित्रा

लंडन : पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाच्या कामगिरीवर टीका-टिप्पणी होत आहे. मात्र भारताविरुद्ध आम्ही ५-० असे निभ्रेळ यश मिळवू, या चर्चेची ही वेळ नाही, अशी प्रतिक्रिया इंग्लंडचा यष्टीरक्षक-फलंदाज जॉनी बेअरस्टोने व्यक्त केली.

रविवारी लॉर्ड्सवर इंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात डावाने विजय मिळवला. इंग्लंड संघ विजयी घोडदौड राखत असला तरी भारतीय संघाकडे मालिकेला कलाटणी देण्याची क्षमता आहे, असे बेअरस्टोने सांगितले.

‘‘मायदेशातील वातावरणाचा आम्ही उत्तम फायदा घेतला. परंतु भारतीय संघ कमजोर आहे, असा त्याचा मुळीच अर्थ नाही. जागतिक क्रिकेटमधील अव्वल स्थानावरील हा संघ आहे. मालिकेतील बरेच क्रिकेट अजून बाकी आहे,’’ अशी आशा बेअरस्टोने प्रकट केली.

‘‘वातावरणातील ऊबदारपणा वाढतो आहे. साऊदम्पटन आणि द ओव्हलच्या खेळपट्टय़ा कोरडय़ा आहेत. त्यामुळे अतिआत्मविश्वासाने कोणतेही विधान करणार नाही,’’ असे तो म्हणाला. मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याला नॉटिंगहॅम येथे शनिवारपासून प्रारंभ होणार आहे. बेअरस्टोने पहिल्या कसोटी सामन्यात अनुक्रमे ७० आणि २८ धावा केल्या, तर दुसऱ्या कसोटीत ९३ धावा काढल्या.

तिसऱ्या कसोटी सामन्यात बेन स्टोक्स इंग्लंडच्या संघात परतणार आहे. याविषयी बेअरस्टो म्हणाला, ‘‘न्यायालयीन निकालात स्टोक्सला दिलासा मिळाला आहे, ही त्याच्यासाठी अतिशय मोठी गोष्ट आहे. गेले दहा महिने तो आणि त्याचे कुटुंबीय या दडपणाखाली वावरत होते.’’